Vantaras explanation : नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी या हत्तीणीच्या गुजरातमधील वंतारा येथील राधे कृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट (RKTEWT) येथे हस्तांतरणाबाबत बरीच माहिती आणि सम-गैरसमज समाजमाध्यमांवर आणि इतरत्र पसरले आहेत. याबद्दल वनताराने स्पष्टीकरण दिले आहे. वनताराने मांडलेली बाजू सविस्तरपणे जाणून घेऊया.
या प्रकरणात सत्य समोर आणण्यासाठी आणि गैरसमज दूर करण्यासाठी पेटा (PETA) या प्राणी कल्याणासाठी कार्यरत असलेल्या संस्थेने २०२२ पासून महादेवीच्या परिस्थितीवर लक्ष ठेवले होते आणि याबाबत सविस्तर तक्रार पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या उच्चाधिकार समिती (HPC) कडे सादर केली होती. या तक्रारीत हत्तीणीच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाबरोबरच तिच्या बेकायदेशीर वापराचे पुरावे सादर करण्यात आले होते. येथे या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
महादेवी हत्तीणीच्या परिस्थितीचा मागोवा कसा घेतला?
पेटाने ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी उच्चाधिकार समितीकडे सादर केलेल्या तक्रारीत महादेवीला गंभीर शारीरिक जखमा, लंगडेपणा, पाय पातळ होणे आणि मानसिक त्रासाची लक्षणे (जसे की डोके हलवणे) आढळली. याचे पुरावे म्हणून छायाचित्रे, पशुवैद्यकीय अहवाल आणि इतर नोंदी सादर करण्यात आल्या.२०१२ ते २०२३ दरम्यान, महादेवीला १३ वेळा महाराष्ट्रातून तेलंगणाला नेण्यात आले, बहुतेक वेळा वन विभागाच्या परवानगीशिवाय ही कृती करण्यात आली. यामुळे वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ च्या कलम ४८अ आणि ५४ चे उल्लंघन झाले. या काळात तिचा वापर मोहरमसारख्या मिरवणुकींसाठी, भीक मागण्यासाठी आणि सार्वजनिक प्रदर्शनासाठी केला गेल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. हत्तीणीला धातूच्या अंकुशाने नियंत्रित केले जात होते, ज्यावर बंदी आहे. तसेच, मुलांना तिच्या सोंडेवर बसवण्यात येत होते. सर्वात धक्कादायक म्हणजे, मठात हत्तीच्या सहभागाने पूजा करण्याची संधी लिलावाद्वारे विकली जात होती, ज्यामुळे तिचा व्यावसायिक वापर स्पष्ट होतो. २०१७ मध्ये, महादेवीने मठाच्या मुख्य पुजाऱ्याला जीवघेणी जखम केली होती, ज्यामुळे तिच्या दीर्घकालीन सुरक्षिततेची चिंता निर्माण झाल्याचे वनताराने म्हटले.
कायदेशीर कारवाई आणि तपासणीत काय झालं?
८ जानेवारी २०२३ रोजी, तेलंगणा वन विभागाने महादेवीच्या माहूत बी. इस्माईल यांच्याविरुद्ध वन्यजीव गुन्हा (पीओआर क्रमांक १२-०७/२०२२-२३) नोंदवला. हा गुन्हा २५,००० रुपये दंड भरून माहूताने कबूल केला, आणि हत्ती कोल्हापूरच्या स्थानिक हँडलरकडे सोपवण्यात आली. १२ ऑगस्ट २०२३ रोजी, स्थानिक पोलिसांच्या पत्रानंतर सरकारी पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या पथकाने महादेवीची तपासणी केली. त्यात तिच्या उघड्या जखमा, पायांचे आजार आणि मानसिक त्रासाची लक्षणे आढळली. २० ऑक्टोबर २०२३ रोजी, अॅनिमल राहतचे डॉ. राकेश चित्तोरा यांनी सविस्तर अहवाल सादर केला, ज्यात हत्तीला रुग्णालयात दाखल करणे आणि पुनर्वसनाची शिफारस करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. HPC ने या पुराव्यांवर चौकशी सुरू केली आणि मठाला जून २०२४ पासून हत्तीच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी दिला. मात्र, जून आणि नोव्हेंबर २०२४ च्या तपासणीत केवळ वरवरचे बदल दिसले, आणि गंभीर वैद्यकीय व कल्याणकारी समस्या कायम होत्या. त्यामुळे २७ डिसेंबर २०२४ रोजी, HPC ने महादेवीला जामनगरमधील RKTEWT येथे हस्तांतरित करण्याचा आदेश दिला, जिथे तिला नैसर्गिक वातावरण, पशुवैद्यकीय काळजी, समाजीकरण आणि प्रशिक्षित हत्ती पाळणाऱ्यांची सुविधा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.
After 33 years alone and in chains, Mahadevi (Madhuri) is finally receiving the care she deserves thanks to @petaindia’s action!
Mahadevi was controlled with weapons and forced into chaotic ceremonies. Now, she’s starting a new life with other elephants at @Vantara_RF pic.twitter.com/AYybbfdLOg
— PETA (@peta) August 2, 2025
न्यायालयाने काय दिला निर्णय?
मठाने HPC च्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. १६ जुलै २०२५ रोजी, सविस्तर सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने मठाची याचिका फेटाळली आणि हत्तीच्या कल्याणाला धार्मिक रीतिरिवाजांपेक्षा प्राधान्य दिले.मठाने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु २८ जुलै २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आणि महादेवीला दोन आठवड्यांत हस्तांतरित करण्याचे निर्देश दिल्याची माहिती देण्यात आली.
वनताराची भूमिका काय?
वंतारा यांनी या हस्तांतरण प्रक्रियेत सक्रियपणे कोणतीही भूमिका बजावली नाही. HPC ने त्यांच्या हत्ती कल्याणातील क्षमता आणि यशस्वी ट्रॅक रेकॉर्डच्या आधारे त्यांना केवळ प्राप्तकर्ता म्हणून निवडले. वंताराने फक्त न्यायालयाच्या आदेशांचे पालन केले आहे. हस्तांतरण प्रक्रियेत कोल्हापूर विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी आवश्यक परवाने आणि वाहतूक व्यवस्था करून महादेवीला जामनगर येथे पोहोचवले. वंताराने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर महादेवीच्या पुनर्वसन योजनेची माहिती दिली आहे. तिच्या प्रारंभिक तपासणीत पायांचे जुनाट आजार, अतिवृद्ध नखे, लॅमिनाइटिस, डाव्या पायातील फोडा आणि गुडघ्यांवरील वेदनादायक सूज आढळली. आता तिला हायड्रोथेरेपी दिली जाणार असून विशेष पशुवैद्यकीय काळजी घेतली जाणार असल्याचे वनताराने म्हटलंय.
‘वनताराला बदनाम करण्याचा प्रयत्न’
कायदेशीर प्रक्रिया आणि पुराव्यांनंतरही वंतारा आणि त्यांच्या समर्थकांना बदनाम करण्यासाठी चुकीची माहिती पसरवली जात आहे. वंतारा ही एक परोपकारी संस्था आहे, ज्यांचा दैनंदिन कामकाजात त्यांच्या प्रवर्तक कुटुंबाचा कोणताही सहभाग नाही. त्यांनी केवळ न्यायालयाच्या आदेशांचे पालन केले आहे. जर त्यांनी हस्तांतरण न केले असते, तर ते न्यायालयाच्या अवमानाला सामोरे गेले असते. मठाने सुरुवातीला महादेवीचे पुनर्वसन करण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु नंतर त्यांनी आपली भूमिका बदलली आणि न्यायालयात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर मठाधिपती जिनसेन भट्टारक यांनी निर्णय मान्य असल्याचे सांगितल्याचे वनताराने म्हटलंय.
हस्तांतरणाविरोधात नांदणी गावकऱ्यांनी आंदोलन केले, आणि सतेज पाटील, राजू शेट्टी यांनी स्वाक्षरी मोहीम राबवली. २४ तासांत १,२५,३५३ स्वाक्षऱ्या जमवून राष्ट्रपती कार्यालयाकडे पाठवण्यात आल्या. मात्र, कायदेशीर प्रक्रियेनुसार हत्ती आता सरकारी मालमत्ता आहे, आणि तिच्या कल्याणासाठी वन विभाग आणि न्यायालय जबाबदार असल्याचेही वनताराने म्हटलंय.