Raut On Nishikant Dubey: भारतीय जनता पार्टीचे खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा एकदा ठाकरे बंधुंना डिवचलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा संदर्भ देत दुबेंनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे बीएमसी इलेक्शनमध्ये अपयशी ठरतील असं भाकित केलं आहे. आपल्या या दाव्याचं समर्थन करताना दुबेंनी मुंबईतील मराठी मतांचाही उल्लेख केला आहे. मात्र दुबेंच्या या विधानावर प्रतिक्रिया नोंदवताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं खोचक टोला लगावत त्यांचा समाचार घेतला आहे. ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दुबेंच्या विधानावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
दुबे आता नेमकं काय म्हणाले?
दुबेंनी महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर बोलातना ठाकरे गट आणि मनसेवर निशाणा साधला आहे. “राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकारण पुढील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत संपणार आहे,” असं विधान दुबेंनी केलं आहे. दुबेंच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
मराठी मतांवरुन दुबे काय बोलले?
निशिकांत दुबेंनी याआधी मराठी भाषा आणि महाराष्ट्राविरोधात विधानं केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. यातच आता पुन्हा त्यांनी ठाकरे बंधूंबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. मुंबईतील मतदारांबद्दलही दुबेंनी भाष्य केलं आहे. मुंबईमधील मतं विभाजनाची आकडेवारी सांगताना दुबेंनी ठाकरेंचं भाषिक राजकारण महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अपयशी ठरेल आणि त्यांच्या हाती निराशाच लागेल असं भाकित झारखंडच्या या खासदाराने व्यक्त केलं आहे.
‘मुंबईत फक्त 30 टक्के लोक मराठी बोलतात. 30 टक्के लोक हिंदी बोलतात. अडीच टक्के लोक राजस्थानी बोलतात. त्याचप्रमाणे काही लोक गुजराती, तर काही भोजपुरी बोलतात. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं भाषेवरील हे राजकारण यावेळी पूर्णपणे अपयशी ठरणार आहे,’ असा दावा दुबेंनी केला आहे. आता दुबेंच्या या विधानावर मनसे आणि ठाकरेंची शिवसेना काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दुबेंना राऊतांनी काय उत्तर दिलं?
“दुबेंना फार महत्त्व देताय. मराठी माणसाविरोधात तो बोलतोय. त्या विरोधात फडणवीस बोलत नाहीत. हा मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय आहे. महाराष्ट्रासाठी 106 लोकांनी हौतात्म्य पत्कारलं त्यात दुबे, चौबे नाहीत. हे दुबेनं समजून घ्यावं,” असा टोला राऊतांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना लागवला. “दुबे मुंबईत पैसे कमवायला आलेत. तुमच्या राज्यात नोक-या नाहीत म्हणून मुंबईत आलात,” असंही राऊत म्हणाले. त्याचप्रमाणे, “मराठी माणसाच्या पोटावर मारून मुंबईला लुटलं जातंयं,” असंही राऊतांनी म्हटलं आहे.