अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे २०२४ वर्षातील राज्यस्तरीय विविध साहित्य पुरस्कारांचे वितरण नुकतेच संपन्न झाले. ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
.
कार्यक्रमात बोलताना देशमुख यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “वाचनातून घडणारे संस्कार महत्त्वाचे असतात. चारित्र्यवान पिढी घडण्यासाठी बालवयापासून मुलांना वाचनाची गोडी लावणे आवश्यक आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की वाचन हे मानवनिर्मित कृत्रिम माध्यम असले तरी ती उन्नत मानवी संस्कृती आहे. वाचनातून जिज्ञासा वाढते आणि त्यातून आकलन वाढते. अधिक मानवीय होण्यासाठी वाचन उपयुक्त आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संदर्भ तज्ज्ञ व ग्रंथ प्रसारक प्रसाद भडसावळे होते. संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. राजेंद्र झुंजारराव, मराठी विभाग प्रमुख डॉ. निशा भंडारे आणि संजय ऐलवाड व्यासपीठावर उपस्थित होते.
मॉडर्न महाविद्यालयातील मराठी विभागाच्या सहकार्याने आयोजित हा कार्यक्रम महाविद्यालयातील लता मंगेशकर सभागृहात पार पडला. अभिनव वाचन उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्र आणि ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. वाचनासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणाऱ्या शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला.
देशमुख यांनी सजग नागरिकत्वाच्या निर्मितीत वाचनाचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, “राज्यकर्ते लोकशाही टिकवित नाहीत तर सजग नागरिक ती टिकवितात. सजग नागरिक बनण्यात वाचनाचे मोठे योगदान आहे.”
प्रसाद भडसावळे यांनी मुलांच्या वाचनाबद्दल आपले विचार मांडले. ते म्हणाले, “संस्कार ही लादण्याची नव्हे तर अनुकरण करण्याची गोष्ट आहे. मुलांनी काय वाचावे यावर बंधने आणू नयेत, परंतु चांगल्या साहित्यकृती उपलब्ध करून दिल्या तर मुले नक्कीच आवडीने वाचतात.”
पुरस्कार प्राप्त लेखकांच्या वतीने कल्पना मलये यांनी मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “बालसाहित्यविषयक क्षेत्रात गेली ५० वर्षे कार्य करणाऱ्या मातृसंस्थेकडून पुरस्कार मिळणे ही आनंदाची बाब आहे. बालकांचे भावविश्व समजून घेत त्यांच्यासाठी साहित्यकृती निर्माण करणे ही अवघड गोष्ट आहे.”