Yugendra Pawar Engagement: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला. आता अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युवा नेते युगेंद्र पवार यांचा साखरपुडा आज तनिष्का संजीव कुलकर्णी यांच्यासोबत होणार आहे.
हा साखरपुडा मुंबईतील प्रभादेवी येथील तनिष्का कुलकर्णी यांच्या निवासस्थानी पार पडणार आहे. या साखरपुडा समारंभाला शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे तसेच पवार कुटुंबातील अनेक सदस्य आणि जवळचे मित्रपरिवार उपस्थित राहणार आहेत.
आज मुंबईत पार पडणार युगेंद्र पवार यांचा साखरपुडा
पवार कुटुंबातील या वर्षांमधील या सलग दोन साखरपुड्यांमुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. युगेंद्र पवार हे तरुण नेते म्हणून राजकारणात सक्रिय असून सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रीय सहभाग आहे. तर तनिष्का कुलकर्णी याही शिक्षित आणि संस्कारी कुटुंबातून येत असून त्यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत दिलखुलास असल्याचे सांगितले जाते.
साखरपुड्याचा सोहळा पारंपरिक पद्धतीने पण अत्यंत मोकळ्या वातावरणात पार पडणार आहे. या नवदांपत्याला पुढील आयुष्यासाठी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
काही दिवसांपूर्वीच पार पडला जय पवार यांचा साखरपुडा
अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. या समारंभाला शरद पवार, सुप्रिया सुळे, श्रीनिवास पवार, तसेच अनेक नातेवाईक, मित्रपरिवार आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. हा खासगी समारंभ अत्यंत शिस्तबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला. जय पवार हे अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे चिरंजीव असून शिक्षणानंतर व्यवसायिक आणि सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग आहे.
जय पवार यांच्या साखरपुड्यामुळे पवार कुटुंबात अनेक वर्षांनंतर असा मोठा कौटुंबिक सोहळा पार पडला असून साखरपुड्यानंतर आता लग्नाची उत्सुकता वाढली आहे. या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. पवार कुटुंबातील या शुभप्रसंगाला राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.