काळेपडळ पोलिस ठाणे हद्दीत एका तरुणाचा त्याच्या मित्रानेच खून केल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी केवळ दोन तासांत आरोपीला अटक केली. सुरुवातीला चार अनोळखी व्यक्तींवर संशय असला, तरी तपासात मयताचा जवळचा मित्रच खुनी असल्याचे उघड झाले.
.
शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास किसन राजमंगल सहा (२०, रा. बिहार) याने डायल ११२ वर कॉल करून माहिती दिली. त्याने सांगितले की त्याचा मित्र रविकुमार शिवशंकर यादव (३३) यावर चार अनोळखी इसमांनी हल्ला केला आहे. त्याला डोक्यात लोखंडी पहार मारून गंभीर जखमी केले आहे.
काळेपडळ पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि महमंदवाडी बीटचे पथक घटनास्थळी पोहोचले. साईगंगा सोसायटीसमोरच्या पत्र्याच्या शेडमध्ये रविकुमार यादव रक्ताच्या थारोळ्यात आढळला. त्याला १०८ रुग्णवाहिकेने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
कॉलर किसन सहा याच्या जबाबात अनेक विसंगती आढळल्या. घटनास्थळाजवळचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता कोणतीही चार अनोळखी इसमांची हालचाल आढळली नाही. शेजाऱ्यांकडून माहिती घेतली असता मयत व कॉलर यांच्यात पूर्वीही किरकोळ वाद होत असल्याचे समोर आले.
पोलिसांच्या प्रश्नांच्या फैरीत गुंतलेला किसन सहा अखेर खरे बोलला. त्याने कबुली दिली की दारूच्या नशेत मयताने त्याला आई-बहिणीवरून शिवीगाळ केली होती. पूर्वीही मारहाण झाल्याने राग मनात धरून, मयत झोपेत असताना त्याने लोखंडी पहाराने डोक्यात वार करून खून केला.
या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.