हिंगोली तालुक्यात वारंवार गुन्हे करणाऱ्या आठ जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली असून त्यांच्या हद्दपारीचे आदेश पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी शुक्रवारी ता. १ काढले आहेत. या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
.
हिंगोली जिल्ह्यात आगामी सण, उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस विभागाने गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मोहिम हाती घेतली आहे. पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र पथके स्थापन करून गुन्हेगारांवर लक्ष ठेवले जात असून त्यासाठी वेळोवेळी कोंम्बिंग ऑपरेशन केले जात आहे.
दरम्यान, जिल्ह्यात दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे असलेल्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना पोलिस अधिक्षक कोकाटे यांनी ठाणेदारांना दिल्या होत्या. त्यानुसार हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी विकास जोजार, केशव तनपुरे, राजू जोजार (रा. सवड), विवेक देशमुख (रा. बळसोंड) यांच्या विरुध्द कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. त्यावरून त्यांना सहा महिन्यासाठी हिंगोली जिल्हयातून हद्दपार करण्यात आले आहेत.
या शिवाय हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप मोदे यांनी शेख साजीद, शेख माजीद, शेख वाजीद, शेख शाहीद यांच्या विरुध्द शरीरा विरुध्द तसेच मालमत्तेविरुध्द दोन पेक्षा जास्त गुन्हे असल्याने त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावानुसार चौघांना एक महिन्यासाठी हिंगोली जिल्हयातून हद्दपार करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक कोकाटे यांनी काढले आहेत. एकाच वेळी आठ जणांवर झालेल्या हद्दपारीच्या कारवाईमुळे गुन्हेगारांची धाबे दणाणले आहेत.