सतीश मोहिते झी 24 तास नांदेड : नांदेडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णाचा पाय उंदराने कुरतडल्याचा प्रकार ताजा असतानाच ग्रामीण रुग्णालयातही असाच प्रकार समोर आलाय…नांदेडच्या कंधार ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या अंगावरून उंदीर फिरत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचे कसे तीन तेरा वाजलेत हेच यावरून दिसून येतंय.. पाहुया..
ही दृश्य आहेत नांदेडच्या कंधार ग्रामीण रुग्णालयातली.. या रुग्णालयात उंदिर कसे रुग्णांच्या अंगावरून फिरताहेत हे तुम्हीच पाहा.. कंधार येथिल ग्रामीण रुग्णालयातील हा व्हिडिओ आहे. एक महिला रुग्ण बेडवर झोपलेली असताना उंदीर तिच्या अंगावरून फिरताना दिसतोय… दुसऱ्या रुग्णाच्या एका नातेवाईकाने हा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे. या रुग्णालयात हा काही एकच उंदिर नाहीय.. तर रुग्णालयात सगळीकडेच उंदिरच उंदिर पाहायला मिळताहेत. जणू या रुग्णालयाचा कब्जाच उंदरांनी घेतला आहे.
आता हे कमी की काय तर दुसरीकडे भोकरच्या उपजिल्हा रुग्णालयात डासांनी अक्षरक्षा उच्छाद मांडलाय.. डासांच्या त्रासामुळे रुग्ण मेटाकुटीला आले आहेत. तुम्हीच पाहा की सलाईन लावलेल्या रुग्णाच्या हातावर हे कसे डास चावत आहेत. एकतर सलाईन लावलय त्यात डास चावताहेत… त्यामुळे रुग्ण हतबल झाल्याची परिस्थिती आहे..रुग्णालय आणि परिसरात प्रचंडं अस्वच्छतेचं साम्राज्य असल्यानं रुग्णालयात डासच डास पाहायला मिळत आहेत.
दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक संजय पेरके यांना या संदर्भात विचारलं असता माहिती मागवलीय.. कारणे दाखवा नोटीस बजावलीय असं म्हणत पठडीतलं उत्तर दिलं आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक जरी उपायोजना करण्याचं म्हणत असले तरी यावर उपायोजना कधी होणार हा प्रश्न आहेच. कारण अवघ्या काहीच दिवसांपूर्वी नांदेडच्या श्री गुरु गोविंदसिंगजी हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये उंदरांची असाच धुमाकुळ घातला होता.. या रुग्णालयात उंदिरांनी चक्क रुग्णाचा पाय कुरतडला होता.. तेव्हाही आरोग्य अधिकाऱ्यांनी उंदरांचा बंदोबस्त करणार असल्याचं म्हटलं होतं..
आरोग्य विभागाची तर ही चूक आहेच.. सोबतच सार्वजनिक बांधमाक विभागाच्याही दुर्लक्षामुळे रुग्णालयांवर ही अवस्था आलीय. शासकीय रुग्णालयांच्या मेंटेनन्सचं काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असतं.. या डागडुजीकडे दुर्लश्र केल्यामुळेही उंदरांची संख्या वाढल्याचं बोललं जातंय.. आता या डागडुजीकडे दुर्लक्ष करणाऱ्या पीडब्लूडीच्या अधिकाऱ्यांवर कारवाईचं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलंय.
शासकीय रुग्णालयात रुग्ण बरे व्हायला जातात की आजार वाढवून घ्यायला जातात असा प्रश्न पडावा अशीच ही परिस्थीती पाहायला मिळतेय.. कुठे उंदिर रुग्णांचे पाय कुरतडताहेत…कुठे उंदिर रुग्णांच्या अंगावरून उड्या मारताहेत.. जणू या शासकीय रुग्णालयांवर या उंदरांनीच कब्जा घेतलाय.. केवळ सरकारी उत्तरं न देता आरोग्य विभाग या उंदरांच्या त्रासातून रुग्णांची सुटका कधी करणार हाच प्रश्न हे नांदेडमधील रुग्ण विचारत आहेत.