जळगावातून एक भयानक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील अमळनेर गावातील ‘सीरियल किलर’ चा कारनामा ऐकून पोलिसही हादरले आहेत. अनिल गोविंद संदानशिव असं या विकृत तरुणाचं नाव आहे. या व्यक्तीने महिलांना त्याच्या जाळ्यात अडकवून त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. एवढंच नव्हे त्यांना पैसे गुंतवून दुप्पट पैसे देतो अशी हमी दिली. त्यानंतर या महिलांची हत्या करुन जंगलात त्यांचे मृतदेह गाडले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपासात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
अमळनेर शहरातील दोन महिलांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडवून दिली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीची फोन रेकॉर्ड तपासला. दरम्यान, आरोपी अनेक महिलांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार आरोपीने अजूनही काही महिलांची हत्या करून त्यांचे मृतदेह जंगलात फेकल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे अमळनेर परिसरातील जंगलात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. या तपासाअंतर्गत अमळनेर पोलिसांनी 25 ते 30 पोलिसांच्या चमूसह जंगल परिसरात शोध मोहीम हाती घेतली. सतत सुरू असलेल्या पावसाची तमा न बाळगता पोलीस कर्मचारी जंगलात उतरले आणि विविध ठिकाणी तपासणी केली.
अमळनेर जंगलात खुनी खेळ
वनविभागाच्या सहकार्याने पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात आला. या ऑपरेशनदरम्यान, काही संशयास्पद वस्तू पोलिसांच्या हाती लागल्या असून, त्या तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्या आहेत. आरोपीने महिलांच्या मृतदेहाची विल्हेवाट जंगलात लावली आहे. महिलांचा चेहरा दगडाने ठेचून त्यांची हत्या केली आहे. आरोपीने अजून किती महिलांची हत्या केली? त्याने मृतदेह कुठे फेकले? एकट्याने हे सर्व गुन्हे केले की त्याला कोणी मदत केली? या सर्व शक्यतांचा पोलीस तपास करत आहे.
महिलांना कसा जाळ्यात अडकवायचा?
अनिल संदानशिवचं बोलणं अतिशय मधुर, वागणं शांत आणि सोज्वळ वाटायचं. त्याच्याकडे असं काही आकर्षण होतं की, अनेक महिला सहज त्याच्या प्रेमात पडत असत. याच त्याच्या स्वभावाचा तो गैरफायदा घेत असे. अनिल संदानशिव महिलांशी ओळख वाढवण्यासाठी बसमध्ये, गावात किंवा कामाच्या ठिकाणी गोड बोलायचा. एकदा विश्वास बसला की, तो त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करायचा आणि नंतर त्यांना सुमठाणे परिसरातील सामाजिक वनीकरण विभागाच्या जंगलात घेऊन जायचा. तिथे त्यांच्या डोक्यात दगड घालून क्रूर हत्या करायचा. हत्या करण्यापूर्वी तो त्यांच्याकडील सोनं, रोख रक्कम अशा मौल्यवान वस्तूंची लूट करायचा.