पुण्यातील संरक्षण क्षेत्रात कार्यरत असलेली नामांकित कंपनी भारत फोर्ज लिमिटेडने एरोस्पेस घटकांच्या पुरवठ्यासाठी प्रॅट अॅण्ड व्हिटनी कॅनडासोबत करार केला आहे. या करारामुळे एरोस्पेस अॅप्लिकेशनसाठी समर्पित अशी एक नवीन अत्याधुनिक रिंग मिल स्थापन केली जाणार
.
ही नवीन रिंग मिल भारत फोर्ज लिमिटेडच्या एरोस्पेस उत्पादन क्षमतेच्या चालू विस्ताराचा एक भाग म्हणून उभारली जाणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेत आणि जागतिक दर्जाच्या गुणवत्तेचे व ट्रेसिबिलिटी मानकांचे पालन करत या उत्पादन केंद्राची रचना करण्यात आली आहे.
भारत फोर्ज लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि सहव्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी यांनी सांगितले की या नवीन रिंग मिलच्या स्थापनेतून प्रॅट अॅण्ड व्हिटनी कॅनडासोबतची धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होईल. यातून जागतिक एरोस्पेस परिसंस्थेसाठी असलेली त्यांची बांधिलकी दिसून येते. तसेच भारताच्या उच्च मूल्य एरोस्पेस घटकांच्या उत्पादन क्षमतेतील प्रगतीच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
प्रॅट अॅण्ड व्हिटनी कॅनडाचे पुरवठा साखळी उपाध्यक्ष फ्रेडरिक लेफेब्रवे म्हणाले की ही भागीदारी त्यांच्या मजबूत जागतिक पुरवठा साखळी उभारण्याच्या आणि भारताच्या एरोस्पेस इकोसिस्टमला पुढे नेण्याच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. मागील सात दशकांहून अधिक काळ प्रॅट अॅण्ड व्हिटनी भारतात कार्यरत असून अत्याधुनिक विश्वासार्ह इंजिन्स विकसित करण्यात योगदान देत आहे.
ही नवीन रिंग मिल २०२६ पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. ती देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय एरोस्पेस प्रकल्पांना पाठबळ देईल. ही सुविधा भारताच्या जागतिक एरोस्पेस उत्पादन केंद्र होण्याच्या दृष्टिकोनातून भरीव योगदान देणारा एक प्रमुख घटक ठरेल.