Kokan Railway TimeTable: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. नागरिकांना कोकणात जाण्यासाठी सुरुवातीला 194 ट्रेन सोडण्यात आल्या होत्या. मात्र या 194 ट्रेनचे आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळं आता रेल्वे प्रशासनाने 44 अतिरिक्त विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दिवा-चिपळूण-दिवा मेमूच्या 2 तर दिवा- खेड दरम्यान 36 फेऱ्या वाढणार आहेत. या 44 सेवा वाढल्यानंतर 296 वर पोहोचली आहे.
मध्य रेल्वेने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) वरून सावंतवाडी, रत्नागिरी, मडगाव या मार्गावर 8 एक्स्प्रेसची घोषणा केली आहे. याद्वारे 196 दुहेरी फेऱ्या नियोजित केल्या होत्या. त्यासह मेमूदेखील चालविण्यात येणार आहे.
एलटीटी-सावंतवाडी दरम्यान 8 फेऱ्यांची वाढ केली आहे. या सेवा 28 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत चालविण्यात येणार आहेत. तर दिवा – खेड मेमूच्या 36 फेऱ्यादेखील वाढल्या आहेत. एक्स्प्रेसचे आरक्षण 3 ऑगस्टपासून सुरू होणार असून, मेमूच्या सेवा अनारक्षित असणार आहेत.
कसे असेल वेळापत्रक?
मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस (01004) ही विशेष साप्ताहिक गाडी 24, 31 ऑगस्ट आणि 7 सप्टेंबर रोजी मडगाव स्थानकातून दुपारी 4.30 वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव (01003) ही विशेष (साप्ताहिक) ही गाडी 25 ऑगस्ट, 1 सप्टेंबर आणि 8 सप्टेंबर रोजी एलटीटी स्थानकावरून सकाळी 8.20 वाजता रवाना होईल. हीच गाडी त्याच दिवशी रात्री 10.40 वाजता मडगाव येथे पोहोचेल, असे कोकण रेल्वे प्रशासनाने सांगितले.
कोणत्या स्थानकांत असेल थांबा?
विशेष गाड्यांना करमाळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल व ठाणे या स्थानकांवर थांबे असणार आहेत.