साडेचार वर्षाच्या चिमुरडीला स्वतःच्या घरी नेऊन तरूणाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली आहे. याप्रकरणी पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला चार
.
कराड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत मुलीची आई मंगळवारी (२२ जुलै) सायकांळी त्यांच्या शेजारी आकाडी जेवणाचा कार्यक्रम असल्याने मदतीसाठी गेली होती. त्यांनी आपल्या साडेचार वर्षाच्या चिमुरडीलाही सोबत नेले होते. पिडीत मुलीची आई स्वयंपाक बनवण्यात व्यस्त असताना मुलगी खेळण्यासाठी घरातून बाहेर गेली. त्याचवेळी संशयिताने चिमुरडीला आपल्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
अत्याचाराचा प्रकार रक्तस्त्रावामुळे चिमुरडीच्या आईच्या लक्षात आला. त्यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्यासह वरिष्ठ शहर पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी घटनास्थळी भेट दिली. त्याच दिवशी रात्री उशीरा संशयित तरूणावर पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पीडित चिमुरडीला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.
कराड शहर पोलिसांनी संशयिताला मंगळवारी ताब्यात घेऊन रात्री उशीरा अटक केली. बुधवारी दुपारी कराड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवस पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, अत्याचाराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित गावातील लोकांनी संशयित तरूणाला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.
पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल गोपनीय ठेवण्यात आला आहे. संशयिताला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणातील बारीकसारीक पुरावे आम्ही गोळा करत आहोत, अशी माहिती या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक जे. एस. वाघमोडे यांनी दिली.
