पुणे पोलिस दलातील वाहतूक शाखेतील पोलिस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोहगाव परिसरात घडली आहे.या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
.
राजेंद्र विलास गायकवाड (वय ४२, रा. डी वाय पाटील काॅलेजजवळ, धानोरी, लोहगाव,पुणे) असे आत्महत्या केलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. गायकवाड हे वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात नियुक्तीस होते. शनिवारी (१९ जुलै) गायकवाड यांची साप्ताहिक सुटी होती. त्यांची पत्नी दौंड याठिकाणी गेली होती. त्यांना १२ आणि १४ वर्षांची दोन मुले देखील आहेत. मुले सकाळी शाळेत गेली होती. सकाळी त्यांच्या पत्नीने पतीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मुले दुपारी शाळेतून घरी आले. तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. मुलांनी दरवाजा वाजविला. परंतु, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांनी शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. दरवाजा वाजवूनही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने शेजाऱ्यांनी यबाबत घटनेची माहिती विमानतळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी दरवाजा उघडला. तेव्हा गायकवाड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. गायकवाड यांच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण अजून समजू शकले नाही. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले
पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना बाणेर परिसरात घडली.याबाबत एका ज्येष्ठ महिलेने बाणेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांन दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला बाणेर भागात राहायला आहेत. त्या बाणेरमधील पॅनकार्ड क्लब रस्त्याने निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ६० हजारांचे मंगळसूत्र हिसकाविले. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात पसार झाले. या घटनेची माहिती माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी बाणेर परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, सहायक पोलिस निरीक्षक डाबेराव तपास करत आहेत.