भविष्य सांगण्याच्या बहाण्याने 25 वर्षीय तरुणीला एकांतात नेलं आणि…पुण्यात भोंदू बाबाचा संतापजनक प्रकार!


Pune Crime: भोंदू बाबांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून वारंवार करण्यात येत असते. पण याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. याचा फायदा काही समाजकंटक उचलताना दिसतात. पुण्यातील धनकवडी परिसरात असाच एक धक्कादायक प्रकार घडलाय. एका भोंदू ज्योतिषाने भविष्य सांगण्याच्या बहाण्याने 25 वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. अखिलेश लक्ष्मण राजगुरू असे या भोंदू ज्योतिषाचे नाव असून सहकारनगर पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून अशा भोंदूबाबांविरोधात कठोर कारवाईची मागणी होतेय. कसा घडला नेमका प्रकार? सविस्तर जाणून घेऊया. 

तरुणी भोंदू बाबाकडे गेली

फिर्यादी असलेली 25 वर्षीय तरुणी ही कायद्याचे शिक्षण घेतेय.अखिलेश राजगुरू हा ज्योतिषी पत्रिका पाहून भविष्य सांगतो, असे तिला  तिच्या मैत्रिणीने सांगितले. यानंतर ती त्या भोंदू बाबाकडे गेली होती. 12 जुलै 2025 रोजी तिने आपल्या भावाची पत्रिका या ज्योतिषाला दाखवली. पत्रिका पाहिल्यानंतर राजगुरूने तिला, “तुमच्या भावाला एक खास वनस्पती द्यावी लागेल, ती मागवून घेतल्यानंतर तुम्ही पुन्हा या,” असे सांगितले.18 जुलै रोजी राजगुरूने फिर्यादी तरुणीला वनस्पती घेण्यासाठी उद्या येण्याचे सांगितले. त्यानुसार, 19 जुलै रोजी ती धनकवडी येथील त्याच्या “श्री स्वामी समर्थ ज्योतिष कार्यालयात” गेली. तिथे राजगुरूने तिला, “तुमच्या डोक्यावर ही वनस्पती ठेवून मंत्र म्हणावे लागतील,” असे सांगितले. 

अचानक मिठी मारली

मात्र यावेळी तरुणीला त्याच्या वागण्याबाबत संशय आला आणि ती तिथून निघण्याचा प्रयत्न करू लागली. याचवेळी अखिलेश राजगुरूने अचानक तिला मिठी मारली आणि तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.तरुणीने धैर्य दाखवत त्याला विरोध केला आणि तातडीने तिथून निघून आपल्या भावाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिने सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे सहकारनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत राजगुरूच्या कार्यालयावर छापा टाकला आणि त्याला अटक केली. त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी भोंदू बाबाचा तपास सुरू केला. या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झालाय. 

कोण आहे भोंदू बाबा?

अखिलेश राजगुरू हा स्वतःला ज्योतिषी म्हणवतो आणि भोळ्या-भाबड्या लोकांचा विश्वास संपादन करतो. अशा भोंदूबाबांमुळे समाजात अंधश्रद्धा वाढत असून अशा व्यक्तींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिकांनी केलीय. सहकारनगर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, यापूर्वीही अशा प्रकारच्या तक्रारी राजगुरूविरुद्ध आल्या होत्या का?, याची चौकशी सुरू आहे.

पोलिसांचे आवाहन 

अशा भोंदू ज्योतिषी आणि बाबांच्या जाळ्यात अडकू नये. कोणत्याही संशयास्पद व्यक्ती किंवा घटनेबाबत तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केलंय. तसेच अशा घटनांमुळे अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असेही ते म्हणाले.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24