लहानपणी क्रीडापटू खाशाबा जाधव यांना पाहताच, आपणही देशासाठी पदक मिळवायचे, असा निश्चय करणाऱ्या छोट्या मुरलीकांतचा देशाला भूषणास्पद अशा चँपियन पदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास मनोगतांतून उलगडला आणि श्रोत्यांना भारावून टाकणारा ठरला.
.
पुण्यातील हिंदू महिला सभेच्या वतीने स्वा. सावरकर यांनी मोरया बोटीतून मारलेल्या, त्रिखंडात गाजलेल्या उडीचे औचित्य म्हणून एका धाडसी व्यक्तीला साहस पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो, यावर्षी पॅरा ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पहिले सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांना हा साहस पुरस्कार तर ‘आपलं घर’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक विजय फळणीकर यांच्या मातोश्री कै. लीलावती फळणीकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा सजग पुरस्कार स्वामीनिवास वृद्धाश्रमाच्या संस्थापिका गौरी धुमाळ यांना क्रीडामहर्षी व ज्येष्ठ व्यायामतज्ज्ञ डॉ. अरुण दातार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
हिंदू महिला सभेच्या नवरात्र महोत्सवाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृह येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांचे सुपुत्र अर्जुन पेटकर, सून राखी पेटकर, आपलं घर या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक विजय व साधना फळणीकर, महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या शुभांगी दामले आदी मान्यवर उपस्थित होते.
मुरलीकांत पेटकर यांच्याशी सुमेधा चिथडे व राखी पेटकर यांनी संवाद साधला. पेटकर यांनी बालपणापासूनच्या आठवणींमधून आपला जीवन प्रवास उलगडला. बालपणी सांगलीजवळच्या इस्लामपूर येथे कुस्तीगिरांसाठी थंडाई तयार करण्याची मिळालेली संधी, त्यानिमित्त त्यांचा सहवास, निरीक्षणातून शिकलेले डावपेच, मूळचे क्रीडाप्रेम, आणि खाशाबा जाधवांच्या दर्शनाने मिळालेली पदक मिळवण्याची प्रेरणा, सरपंचाच्या मुलासोबत जिंकलेली ५ रुपयांची कुस्ती असा प्रवास पेटकर यांनी सांगितला.
यानंतर सैन्यातील भरती, तिथे शिकलेले हाॅकी, बॉक्सिंग सारखे खेळ, त्यात मिळवलेले प्राविण्य, काश्मीरमध्ये मागून घेतलेले पोस्टिंग, तिथे अनुभवलेले १९६५ चे युद्ध, त्या युद्धात झेललेल्या ९ गोळ्या, जखमी, अपंग अवस्थेतील रुग्णालयातील मोठा काळ, दोन वर्षे कोमात काढल्यावर आलेली जाग आणि मग आयुष्यभरासाठी वाट्याला आलेले अपंगत्व ही त्यांची आपबीती अक्षरश: चित्रपटाच्या कथेसारखी सर्वांसमोर उभी राहिली.अपंगत्व आल्या नंतर नव्याने सुरू झालेला संघर्ष मग पॅरा ऑलिंपिक क्रीडापटूपर्यंतची स्फूर्तिदायी वाटचाल पेटकर यांच्या आठवणींतून उपस्थितांसमोर अलगद साकारली गेल्या.
मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘चंदू चँपियन’ हा हिंदी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. दिग्दर्शक कबीर खान, अभिनेते कार्तिक आर्यन यांनी माझा जीवनसंघर्ष चांगल्या पद्धतीने चित्रित केला आहे. काही अपरिहार्य सिनेमटिक लिबर्टी वगळता, चित्रपटाने माझे आयुष्य उत्तम साकारले असल्याचे पेटकर यांनी यावेळी नमूद केले.