शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत मोठे विधान केले आहे. शिवसेना फुटल्याची खंत असून, दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात, अशी आशा असल्याचे ते म्हणालेत. शिवसेना म्
.
अंबादास दानवे यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपत आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्यांचा निरोप समारंभ पार पडला. दानवेंच्या निरोप समारंभाच्या भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची एकमेकांवरील टोलेबाजी पाहायला मिळाली. तसेच अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या फोटोसेशन वेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांकडे पाहणे टाळले होते आणि बाजूला बसणे देखील टाळले होते. आता अंबादास दानवेंच्या उपरोक्त विधानामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
नेमके काय म्हणाले अंबादास दानवे?
अंबादास दानवे यांनी ‘एबीपी माझा’ला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी त्यांना दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात असे तुम्हाला वाटते का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अंबादास दानवे म्हणाले, “मी तेवढा मोठा नाहीये. पण निश्चित मी त्यादिवशी सुरुवातीलाच म्हटले की, मनाला वेदना झाल्या. जी संघटना अखंड ताकदवान होती, ठीक आहे, सत्तेत बसणे वगैरे, आम्ही काय सत्तेसाठी जन्माला आलेलो नाहीत. सत्ता येईल आणि जाईल. पण जी संघटना फुटली त्याच्या वेदना मनाला आणि हृदयाला झालेल्याच होत्या. या वेदना कधी ना कधी भरुन निघाव्यात असे मनाला वाटत असते.
अंबादास दानवे पुढे म्हणाले, सगळे एकत्र असले पाहिजे. सगळे लोकं असले पाहिजेत. कारण आपली शिवसेनेचे राज्य असले पाहिजे. आपली महाराष्ट्रात ताकद असली पाहिजे, असे मला शिवसैनिक म्हणून वाटतंच. आशा ठेवायला काही हरकत नाही.
“मी कुणाविषयी वैयक्तिक सल ठेवणार नाही. पण मनाला ही सल कायम आहे की, आपली एवढी मजबूत संघटना कुणीतरी फोडली. तिला कुणाची तरी दृष्ट लागली. संघटना तेवढीच मजबूत व्हावी हीच माझी इच्छा आहे”, असेही अंबादास दानवे म्हणाले.
अंबादास दानवे पुन्हा विधानपरिषदेत येणे कठीण?
दरम्यान, अंबादास दानवे यांचा विधानपरिषदेतील आमदारकीचा काळ संपुष्टात येणार आहे. ते शिवसेनेचा आक्रमक नेता म्हणून ओळखले जातात. अलीकडच्या काळात ठाकरे गटाची भूमिका ठाम आणि जोरकसपणे मांडणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. आता ते विधान परिषदेचे सदस्य राहणार नसल्यामुळे, आगामी काळात ठाकरे गटाला त्यांच्या सारख्या आक्रमक नेत्याची कमतरता भासू शकते. सद्यस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर पुन्हा आमदार म्हणून निवडून येणे शक्य आहे का? यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अंबादास दानवे यांना पुन्हा त्याच जागेवर निवडून येण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणे आवश्यक आहे.
छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथील महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्यानंतरच संबंधित विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. तोपर्यंत अंबादास दानवे यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. विधान परिषदेच्या काही जागांचा कार्यकाळ 2026 मध्ये पूर्ण होणार आहे. मात्र, जर विधानसभा सदस्यांमार्फत निवडून येण्याचा पर्याय विचारात घेतला, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडे केवळ 20 आमदारांचे संख्याबळ असल्यामुळे तो मार्ग कठीण आहे. विधान परिषदेसाठी आवश्यक असलेल्या 40 ते 45 आमदारांच्या पाठिंब्याशिवाय ही निवडणूक शक्य नाही. त्यामुळे अंबादास दानवे यांना पुन्हा विधान परिषदेवर येण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.