करमाडपासून २ किलोमीटर अंतरावर १३८ हेक्टरवर नवीन औद्योगिक वसाहत उभारण्यात येणार असून त्यासाठी ऑगस्ट महिन्यात भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. जमिनीचे संपादन, शेतातील बांधकामे, विहिरी, झाडे आदी मिळून किमान सुमारे १५० कोटी रुपये खर्च अपेक्षित
.
नव्या एमआयडीसीसाठी भूसंपादनाचे पत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांना देण्यात आले आहे. प्रस्तावित जमिनीमध्ये १०९ हेक्टर शेतकऱ्यांकडून आणि २८ हेक्टर सरकारी गायरान आहे.
मूल्यनिर्धारण अहवाल मिळाला
यासंदर्भात उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी सांगितले की, मूल्यनिर्धारणाचा अहवाल प्राप्त झाला असून २ दिवसांत हा प्रारूप निवाडा पाठवणार आहोत. त्यानंतर शेतकऱ्यांसोबत वाटाघाटी केल्यावर ऑगस्टमध्येच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली होईल.
भूसंपादनासाठी पत्र पाठवले
एमआयडीसी, भूमी अभिलेख विभागाने संयुक्त मोजणी केली आहे. एसडीएम यांना भूसंपादनासाठी पत्र पाठवले आहे. लवकरच भूसंपादन सुरू होईल. -अमित भामरे, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी.
‘रेडीरेकनरच्या चौपट भाव द्या’
२०१२ मध्ये ‘डीएमआयसी’साठी एकरी २३ लाख रुपये भाव दिला होता. १३ वर्षांत जमिनीचे भाव वाढले आहेत. त्यामुळे रेडीरेकनरच्या चौपट भाव द्यावा. गावात ८० टक्के जमीन बागायती आहे. त्यामुळे किमान ६० लाख रुपयांपेक्षा अधिक भाव मिळावा तसेच फळबागांची वेगळी किंमत मिळावी, अशी मागणी शेतकरी दत्ताभाऊ करडे यांनी केली.
लघु उद्योजकांना होईल फायदा
‘ऑरिक’मध्ये लहान उद्योगांना राखीव जागा ठेवण्यात येत आहे. भविष्यात रिंग रोड झाल्यास या भागातील लघु उद्योजकांना फायदा होईल. -चेतन राऊत, माजी अध्यक्ष, मसिआ.
२०८ शेतकऱ्यांच्या जाणार जमिनी
या एमआयडीसीमध्ये २०८ शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येणार आहेत. हे क्षेत्र ‘ऑरिक’च्या बाजूलाच असेल. त्यामुळे ‘ऑरिक’मधील उद्योजकांनादेखील याचा फायदा होणार आहे. याबाबत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सटाणा एमआयडीसी ‘ऑरिक’ला लागूनच आहे.