विधानसभेत मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी सत्ताधारी शिवसेना व विरोधी बाकावरील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सदस्यांत राजकीय आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक झाली. त्यात महाविकास आघाडीच्या सदस्यांनी थेट फडणवीस सरकारची लाज काढल्यामुळे सभागृहात तीव्र गद
.
ठाकरे गटाचे आमदार वरूण सरदेसाई यांनी आज सभागृहात वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील संरक्षण विभागाच्या 42 एकर जमिनीचा मुद्दा उपस्थित केला. संरक्षण विभागाच्या मालकीच्या या जमिनीवर सद्यस्थितीत 9483 झोपड्या आहेत. या झोपडपट्टी धारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. सरकार हा प्रश्न केव्हापर्यंत निकाली काढणार? व या प्रकरणी सरकारने केव्हा पाठपुरावा केला? असा प्रश्न सरदेसाई यांनी सरकारला केला.
फडणवीस सरकारची काढली लाज
वरूण सरदेसाई यांच्या या प्रश्नाला मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले. या प्रकरणी 2019 ते 2022 पर्यंत तत्कालीन सरकारने (ठाकरे सरकार) कोणताही पाठपुरावा केला नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांचे हे वाक्य ऐकताच महाविकास आघाडीच्या सदस्यांनी विशेषतः ठाकरे गटाच्या सदस्यांनी एकच गदारोळ सुरू केला. त्यांनी चक्क फडणवीस सरकारची लाज काढली. तसेच देसाईंवर अर्धवट माहिती देण्याचा आरोप केला.
त्यावर शंभूराज देसाई चांगलेच संतापले. मला फार खोलात जायचे नव्हते. पण माझ्यावर अपुऱ्या ब्रिफिंगचा आरोप झाला, असे म्हणत पुन्हा आपल्या वरील वाक्याचा पुनरुच्चार केला. मला नम्रपणे सांगायचे आहे की, 2019 ते 2022 या अडीच वर्षात या प्रकरणाचा एकदाही पाठपुरावा तत्कालीन राज्य सरकारने केंद्राकडे केला नाही, असे ते म्हणाले. ते हे बोलल्यानंतर पुन्हा वरूण सरदेसाई यांच्यासह आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. अध्यक्षांनी वारंवार त्यांना समज देऊन खाली बसण्याची विनंती केली. पण काहीच फायदा झाला नाही.
आमची लाज काढू नका, तुम्ही काय केले ते सांगा
शंभूराज देसाई या गदारोळातच पुढे म्हणाले, अरे तुम्ही 2019 ते 2022 पर्यंत काय केले हे सांगा. एकही पत्र दिले नाही. एकदाही पाठपुरावा केला नाही. कुणाचे सरकार होते त्या काळात. उलट एकनाथ शिंदे 2022 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही 4 वेळा पाठपुरावा केला. तुम्ही काय केले? अरे आमची लाज काढू नका, तुम्ही काय केले हे सांगा. आमची काय लाज काढता. तुम्ही काहीही केले नाही. आम्ही केले. आम्ही करून दाखवले.
या गदारोळात ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव बोलण्यासाठी उठले. पण गदारोळ थांबला नाही. त्यानंतर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील बोलण्यासाठी उठले. ते म्हणाले, याठिकाणी वरूण सरदेसाई यांनी प्रश्न विचारल्यानंतर माननीय मंत्र्यांनी उत्तर दिले. त्यानंतर राम कदम यांनी विचारला, आदित्य साहेबांनी विचारला. त्यावरही उत्तर आले. उत्तर देताना तुमची काही शंका असेल तर मला विचारा मी उत्तर देण्यास तयार आहे. पण हे लोक जन्मतःच हुशार होऊन आलेत का? यांना लाज काढायचा अधिकार आहे का? सरकारला लाज आहे का? हे बोलणार का? मंत्र्यांना बोलणार? तुझ्यापेक्षा जास्त बोलता येते मला, जास्त बोलू नको, असे ते म्हणाले.
नाकाला मिरच्या लागण्याचे काय कारण आहे?
त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी पुन्हा आपले उत्तर देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, मी उत्तर देताना कोणत्याही मुख्यमंत्र्याचे नाव घेतले नाही. केवळ कालावधी सांगितला. मी सर्वकाही रेकॉर्डवरील सांगितले. मी कुणाचे नाव घेतले नाही, तर एवढ्या नाकाला मिरच्या लागण्याचे काय कारण आहे? एवढी लाज काढण्याचे काय कारण आहे? ऐकूण घ्यावे सगळे. मी सांगितले
यावेळी भास्कर जाधव पुन्हा उठले. त्यांनी सरकारचा कोणताही मंत्री कोणत्याही विभागावर भाष्य करत असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. हे चुकीचे असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यावेळी गदारोळात चांगलीच वाढ झाली. त्यामुळे तालिका अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केले.