Maharashtra Restaurant Association Strike: महाराष्ट्रातील सर्व परमिट रूम आणि बार सोमवारी 14 जुलै रोजी बंद राहणार आहेत. इंडियन हॉटेल अँड रेस्तराँ असोसिएशनने (AHAR) पुकारलेल्या राज्यव्यापी बंदचा भाग म्हणून हे परमित रुम आणि बार बंद राहणार आहेत. हॉटेल उद्योगावर अलीकडेच लावण्यात आलेल्या मोठ्या करवाढीला विरोध करण्यासाठी या संपाची घोषणा करण्यात आली आहे.
इंडियन हॉटेल्स अँड रेस्तराँ असोसिएशनने (@AharAssociation) एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी सोमवारी महाराष्ट्र बंदची घोषणा केली. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या क्षेत्राला सद्या ज्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे त्यांना अधोरेखित केलं आहे. ज्यामध्ये विशेषतः अलिकडच्या काळात करण्यात आलेल्या अनेक वाढीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. मद्यावरील मूल्यवर्धित कर (VAT) दुप्पट करणं, परवाना शुल्कात 15 टक्क्यांची वाढ आणि उत्पादन शुल्कात तब्बल 60 टक्क्यांनी झालेली वाढ यांचा विशेष उल्लेख आहे.
पोस्टमध्ये त्यांनी पुढे म्हटलं आहे की, करण्यात आलेल्या अचानक आणि गंभीर बदलांमुळे लहान आणि मध्यम आकाराच्या आस्थापनांवर दबाव येत आहे. यामधील अनेक आस्थापनं आधीच अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करत आहेत. या बंदचा उद्देश कर धोरणांमुळे निर्माण होणाऱ्या हानिकारक परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे, ज्यामध्ये संभाव्य नोकऱ्या जाण्याची शक्यता आणि दीर्घकालीन व्यवसाय बंद पडण्याची शक्यता यांचा समावेश आहे.
सरकारला अधिक वाजवी कर संरचना लागू करण्यासाठी आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आवाहन करण्यासाठी AHAR या संपाचं नेतृत्व करत आहे. त्यांनी सर्व भागधारकांना बंदमध्ये सामील होण्याचे आणि बदलाच्या मागणीसाठी एकत्र येण्याचे आवाहन केलं आहे.
“महाराष्ट्रातील संपूर्ण हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचे नुकसान होत आहे. आमच्या मागण्या ऐकूनही काही झाले नाही. 14 जुलै रोजी राज्यातील प्रत्येक बार आणि परमिट रूम निषेधार्थ बंद राहतील. राज्य सरकारच्या कठोर कर आकारणीच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रातील बार बंद आहेत,” असं आहारचे अध्यक्ष सुधाकर शेट्टी यांनी डेक्कन हेराल्डला सांगितलं. पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “आम्ही संयम दाखवला आहे, वाट पाहिली आहे आणि आवाहन केलं आहे. आता, आम्हाला या बंदद्वारे स्वतःचे म्हणणे मांडावे लागत आहे”.