पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ‘संगीत संन्यस्त खड्ग’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला. नाटकात गौतम बुद्धांचा अपमान होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. यामुळे नाट
.
कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शनिवारी सायंकाळी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘संगीत संन्यस्त खड्ग’ या नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास नाटकाला सुरुवात झाली. खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह अनेक प्रेक्षक प्रयोगाला उपस्थित होते. नाटक सुमारे अडीच तास चालले. त्यानंतर साडेआठच्या सुमारास वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नाट्यगृहात दाखल झाले. नाटकात तथागत गौतम बुद्धांचा संदेश चुकीच्या पद्धतीने मांडला गेला आहे, आणि त्यांच्या विचारांचे विकृतीकरण करण्यात आल्याचा आरोपी करत त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ठिय्या केला.
वंचितच्या कार्यकर्त्यांचा आरोप काय?
या बाबत बोलताना वंचितच्या कार्यकर्त्यांनी म्हटले की, सावरकर लिखित हे नाटक आहे. या नाटकाचा दुसरा प्रयोग होत आहे. सावसकरांच लिखाण नेहमी फुले शाहू आंबेडकरांच्या आणि गौतम बुद्धांच्या विरोधात राहिलेलं आहे. आम्ही ने नाटक पहायला आलो होतो, नाटक पूर्ण पाहिले. यात सावरकरांना जगासाठी बुद्ध कामाचा नसून युद्ध कामाचे आहे असा संदेश दिला आहे. या नाटकात हिंसेचे समर्थन करण्यात आले आहे.
याबाबत बोलताना एका महिला कार्यकर्त्याने सांगितले की, शांततेने नव्हे तर भांडणातून मार्ग निघू शकतो, असे नाटकामधून सावरकरांनी सांगितले आहे. शांततेत सर्व प्रश्न सुटू शकतात या गौतम बुद्धांच्या शिकवणीला नाटकातून विरोध करण्यात आला आहे.
आणखी एका कार्यकर्त्यांने सांगितले की, या नाटकात गौतम बुद्धांच्या विचारांचे पूर्णपणे हनन करण्यात आले आहे. या देशात बुद्धांचे तत्वज्ञान कामाचे नाही, इथे फक्त भांडणे करुन प्रश्न सुटू शकतो असे दाखवण्यात आले आहे. या नाटकाच्या शेवटी बुद्धांवरती तलवार उगारण्यात आली आहे.
नाटकाला हृषिकेश जोशींचे दिग्दर्शन
दरम्यान, ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटकाचे दिग्दर्शन हृषिकेश जोशी यांनी केले असून, सावरकर दर्शन प्रतिष्ठान आणि नाट्यसंपदा कला मंच हे याचे निर्माते आहेत. नाटकाला दीनानाथ मंगेशकर यांचे संगीत आहे. या नाटकाचे सध्या राज्यभरात विविध ठिकाणी प्रयोग सुरू आहेत.