Maratha Military Landscapes of India In UNESCO World Heritage List: “ऐतिहासिक ! अभिमानास्पद !! गौरवशाली क्षण !!!” असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत नाव मिळाल्याच्या बातमीवर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. “आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांना महाराष्ट्र सरकारचा मानाचा मुजरा,” असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच, “महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे, शिवप्रेमींचे मन:पूर्वक अभिनंदन,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सर्वांचं अभिनंदन केलं आहे.
12 नाही 11 किल्ले महाराष्ट्रातील
“छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत!” असं म्हणत फडणवीसांनी, “मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, संपूर्ण देशवासियांचे आराध्यदैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्लेवैभव असलेले 12 किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून त्याचा आता समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील 11 किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे,” असं सांगितलं आहे.
किल्ल्यांमधील ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ कोणतं? हे ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं
“स्वराज्यनिर्मिती आणि ते टिकविण्यासाठी महाराजांनी हे किल्लेवैभव उभारले. शत्रूला न दिसणारे दरवाजे आणि किल्ल्यांचे माची स्थापत्य हे मराठा स्थापत्यशास्त्रातील महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. हे माची स्थापत्य जगातील कोणत्याही किल्ल्यात दिसून येत नाही. माची स्थापत्य म्हणजे गडाच्या सुरक्षिततेचा आणि युद्धकौशल्याचा मुत्सद्दीनीतीने रचलेला भाग आहे. हेच ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ आहे,” असंही फडणवीस म्हणालेत.
या सात जणांचे मुख्यमंत्र्यांनी मनले आभार
“हा टप्पा गाठण्यासाठी अनेकांचे हातभार लाभले,” असं म्हणत फडणवीसांनी काही व्यक्तींचा उल्लेख करत त्यांचे जाहीर आभार मानले आहेत. “सर्वप्रथम मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. त्यांनी दिलेला पाठिंबा आणि केंद्र सरकारकडून सक्रिय सहभाग ही अत्यंत मोलाची बाब ठरली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि संस्कृती मंत्रालयाने यात मोठी मदत केली. मी स्वत: विविध राजदुतांशी संपर्क केला. माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही वेळोवेळी साथ दिली. माझे सहकारी मंत्री आशिष शेलार यांनी स्वत: जाऊन युनेस्कोच्या महानिदेशकांची भेट घेतली. तेथे तांत्रिक सादरीकरण केले. माझ्या कार्यालयातील अपर मुख्य सचिव विकास खारगे तसेच भारताचे युनेस्कोतील राजदूत विशाल शर्मा आणि पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे हेमंत दळवी त्यात सहभागी होते. अनेकांचे हातभार लागले आणि त्यातून देशभरातील शिवभक्तांसाठी आजचा आनंदाचा क्षण साकारला गेला आहे. मी पुन:श्च महाराष्ट्रातील सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो,” असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
या निर्णयाचा काय फायदा होणार?
जागतिक वारसा हक्क म्हणून घोषित झाल्याने आता या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच या किल्ल्यांना भेट देणाऱ्या भारतीय आणि परदेशी पर्यटकांची संख्या वाढेल असं सांगितलं जात आहे.