Ugc New Ragging Rules : कॉलेज किंवा इतर शिक्षण संस्थांमध्ये सीनियर विद्यार्थी जेव्हा ज्युनिअर विद्यार्थ्यांना मानसिक, सामाजिक किंवा शारीरिक त्रास देतात, तेव्हा ते रॅगिंग म्हणून ओळखले जाते. ही क्रिया प्रत्यक्ष समोरासमोरच न होता ऑनलाइन जसे की व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे देखील होऊ शकते. त्यामुळेच अनौपचारिक व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून सीनियर विद्यार्थी जर ज्युनिअर विद्यार्थ्यांना त्रास देत असतील तर त्याला रॅगिंगच म्हटलं जाणार असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्ट केलं आहे.
ज्युनिअर विद्यार्थ्यांना त्रास देण्यासाठी तयार केलेल्या कोणत्याही व्हॉट्सअॅप ग्रुपवर लक्ष ठेवण्याचे निर्देश यूजीसीने उच्च शैक्षणिक संस्थांना दिल्याचं संबंधित अधिकऱ्याने म्हटलं आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे रॅगिंग केल्यास कारवाई
जर कोणत्याही कॉलेज किंवा इतर शिक्षण संस्थांमध्ये जर अशा प्रकारच्या व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे होणाऱ्या त्रासाला रॅगिंग समजले जाणार आहे. त्यासोबतच रॅगिंगविरोधी कायद्यांतर्गत संबंधित शैक्षणिक संस्थेविरोधात कठोर कारवाई देखील केली जाणार असल्याचं यूजीसीने त्यांच्या नवीन दिशानिर्देशांमध्ये म्हटलं आहे.
यामध्ये प्रत्येक वर्षी नवीन विद्यार्थ्यांकडून यूजीसीला अनेक तक्रारी मिळत आहेत. अशातच सीनियर विद्यार्थ्यांकडून ज्युनिअर विद्यार्थ्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप नवीन विद्यार्थी करत आहेत. या प्रकरणी अनेक प्रकरणात सीनियर विद्यार्थी हे अनौपचारिक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून ज्युनिअर विद्यार्थ्यांना मेसेज, फोन करून त्यांना मानसिक त्रास देत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे यूजीसीने हा निर्णय घेतला आहे.
काय म्हटलं आहे यूजीसीने?
उच्च शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही असं यूजीसीने स्पष्ट सांगितलं आहे. तसेच जर एखादे कॉलेज किंवा शिक्षण संस्था रॅगिंगविरोधी नियमांची अंमलबजावणी करण्यास अपयशी ठरलेल्या किंवा टाळाटाळ करणाऱ्या उच्च शैक्षणिक संस्थेचे अनुदान रोखण्यासह त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं देखील यूजीसीने म्हटलं आहे.
व्हॉट्सअॅपवर रॅगिंग कशी होते?
सीनियरकडून ज्युनिअरना अपमानास्पद मेसेज, फोटो, जोक्स पाठवले जातात. त्यांना गप्प राहायला भाग पाडणे किंवा नको त्या गोष्टी करायला लावणे. काही वेळा अश्लील भाषेचा वापर किंवा ट्रोल करणे. हा फक्त मजा आहे या नावाखाली मानसिक छळ केला जातो.