75 वर्षांची शाल ओढली जाते, तेव्हा त्याचा अर्थ तुमचं वय झालं आहे, आता बाजूला व्हा आणि आम्हाला करु द्या असं विधान मोरोपंत पिंगळे यांनी केल्याची आठवण सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितली. साप्ताहिक विवेक निर्मित आणि मंदार मोरोणे व प्रांजली काणे लिखित ‘मोरोपंत पिंगळे – द आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्जन्स’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक . मोहन भागवत यांच्या हस्ते नागपुरात पार पडला. यावेळी ते बोलत होते.
“हे मला करायचं आहे आणि हे असं होण्यासाठी मी हे करणारच हा दृढ निश्चय लागतो. हे फक्त समर्णणातून येतं. मोरोपतांनी इतकी सगळी कामं केली. मग वय झालं, शरीरही दुर्बल झालं, पण तरीही ते करणार. पण त्यांना सांगितलं या काही कामांना सोपवून द्या, बाजूला व्हा, बाजूला झाले,” असं मोहन भागवतांनी यावेळी सांगितलं.
“शेवटी ते नागपूरला येऊन राहिले. त्यांना खडानखडा माहिती होती. आम्हीदेखील सल्ला घेण्यासाठी जायचो. नवीन कल्पनाही सांगायचे. करणारा सापडला तर त्याला बसल्या बसल्या कामाला लावायचे. मी एकदा त्यांना म्हटलं, झालं आता जरा आराम करा. कुठेही मी कसा आराम करु असं ते म्हणाले आहेत. मी इतकं केलं आहे असंही सांगितलं नाही. कोणी जर त्यांच्या कर्तृत्वाचा उल्लेख केला तर ते हसतखळत हलकी संभावना करायचे,” असंही त्यांनी सांगितलं.
“त्यांचं 75 वय पूर्ण झालं होतं. शेवटच्या त्या समारोपाच्या आधीच्या सत्रात आज आपल्या मोरोपंत यांची 75 वर्षं पूर्ण झाली असल्याने त्यांना शाल दिली जात असल्याचं सांगण्यात आलं. शाल पांघरली आणि त्यांना बोला असा आग्रह केला. ते भाषणात म्हणाले, माझी समस्या ही आहे की, मी उभं राहिल्यावर लोक हसू लागतात. मी हसण्यायोग्य काही म्हटलं नाही तरी हसतात. कारण मला वाटतं की, लोक मला गांभीर्याने घेत नाहीत. मी जेव्हा मरेन तेव्हा लोक दगड मारुन पाहतील, खरंच मेले आहेत का?,” अशीही आठवण त्यांनी सांगितली.
त्यांच्या पुढील विधानाचा उल्लेख करत ते म्हणाले, “मग ते असे म्हणाले. 75 वर्षांची शाल ओढली जाते याचा मी जाणतो. त्याचा अर्थ तुमचं वय झालं आहे, आता बाजूला व्हा आणि आम्हाला करु द्या’.
हे चरित्र पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे आणि त्यातून बोध घेतला पाहिजे. हिमालयासारखं कर्तृत्व हे संघाच्या चरणी शरण, असं स्वयंसेवकाचं जीवन असलं पाहिजे. हा जीवनाचा वस्तुपाठ आपण या पुस्तकातून प्राप्त करावा असं आवाहनही त्यांनी केलं.