मराठीच्या मुद्यावर राज व उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याची घोषणा केली. त्याचा मोठा फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. याची प्रचिती आता येऊ लागली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्य
.
ठाकरे बंधूंनी मराठीच्या अस्मितेसाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. हे बंधू आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूकही मिळून लढवण्याची शक्यता आहे. असे झाले तर त्याचा मोठा फटका सत्ताधारी शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत येथील नेते सुधाकर घारे यांनी उपरोक्त दावा केला आहे.
थोरवे लवकरच ठाकरे गटात परततील
शिंदे गटाचे कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे हे शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. पण आता बदललेल्या स्थितीत ते लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात परत येतील, असे रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे रायगड जिल्ह्यातील राजकारणात एकच खळबळ माजली आहे. महेंद्र थोरवे व सुधाकर घारे यांच्यातील राजकीय वाद जगजाहीर आहे. त्यामुळे सुधाकर घारे यांनीच आमदार महेंद्र थोरवे हे उध्दव ठाकरे गटाच्या मार्गावर असल्याचे वक्तव्य केल्यामुळे चर्चेला रंगत आली आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे आमदार महेंद्र थोरवे व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विस्तवही आडवा जात नाही. थोरवे हे सातत्याने राष्ट्रवादीवर टीका करताना दिसून येतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सुनील तटकरेंवर निशाणा साधताना राष्ट्रवादी काँग्रेस हा विश्वासघातकी पक्ष असल्याचा आरोप केला होता. त्यावर राष्ट्रवादीनेही त्यांच्यावर जोरदार पलटवार केला होता. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षांचा सत्ताधारी महायुती आघाडीत समावेश असतानाही ते कायम एकमेकांवर राजकीय चिखलफेक करताना दिसून येतात.
ठाकरे बंधूंचे त्रिभाषा सूत्राविरोधात मनोमिलन
महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत त्रिभाषा सूत्र स्वीकारले आहे. त्यानुसार राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने एप्रिल महिन्यात पहिलीपासून हिंदी भाषा विषय ‘अनिवार्य’ करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याला मनसे व ठाकरे गटाने कडाडून विरोध केला. त्यांनी संयुक्तपणे 5 जुलै रोजी भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली. पण तत्पूर्वीच सरकारने हिंदी सक्तीचा जीआर मागे घेतला. त्यानंतर ठाकरे बंधूंनी नियोजित तारखेला विजयी मेळावा घेतला. या मेळाव्याच्या निमित्ताने राज व उद्धव ठाकरे जवळपास 20 वर्षांनी एका व्यासपीठावर आले.
दरम्यान, राज व उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यामुळे राज्यातील आगामी निवडणुकांमधील राजकीय समीकरणे बिघडली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.