Black Magic Case: भिवंडी तालुक्यातील स्मशानभूमीमध्ये पुरोगामी महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथील स्मशानभूमीमध्ये महिलांच्या फोटोवर तरूणांनी काळी जादू केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील पिपंळास गावातील स्मशानभूमीत घडली आहे. विशेष म्हणजे काळी जादू करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाला खडबडून जाग आली आहे.
दोन तरुणांना अटक
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणाची पोलिसांनी दाखल घेतली. सदर प्रकरणामध्ये कोनगाव पोलीस ठाण्यात पिंपळास गावचे पोलीस पाटील अशोक उमाकांत जाधव यांच्या फिर्यादीवरून दोघांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद झाली असून त्यांना अटक केली आहे. अटक केलेल्या तरुणांची ओळख पटली असून त्यापैकी एकाचं नाव कबीर दिलीप चौधरी असं असून तो 29 वर्षांचा आहे. तर दुसऱ्या आरोपीचं नाव निखिल संतोष पाटील असं असून तो अवघ्या 23 वर्षांचा आहे.
कशासाठी केली जात होती काळी जादू?
कबीर आणि निखिल यांनी संगनमतानं 29 जून ते 4 जुलैच्या मध्यरात्री दोन अनोळखी महिलांच्या फोटोवर गावातील समशानभूमीत अघोरी कृत्य करत होते. खळबळजनक बाब म्हणजे दोन अनोळखी महिलांच्या जीवाला धोका व्हावा, या उद्देशानं काळी जादू करून त्यांच्या फोटोंवर लिंबूला टाचणी टोचून पिंपळास गावातील स्मशानभुमीमध्ये ठेवले होते. दरम्यान हा धक्कादायक प्रकार काही गावकऱ्यांच्या लक्षात येताच गावकऱ्यांनी या घटनेचा व्हिडिओ करून सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळं हा प्रकार समोर आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणासंदर्भात पोलीस काय म्हणाले?
ही घटना प्रकाशझोतात आल्यानंतर गावचे पोलीस पाटील अशोक जाधव यांनी सर्व प्रकाराची चौकशी करून कोनगाव पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शनिवारी 5 जुलै रोजी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या गुन्ह्याच्या आधारे पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत दोन्ही तरुणांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली,” असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम मस्के यांनी सांगितलं. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहन गायकवाड करत आहेत.
अंधश्रद्धा निर्मुलनाच्या माध्यमातून राज्यातील वेगवेगळ्या संस्था अशा प्रकरणांसंदर्भात जनजागृती करत असतानाही मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.