हिंगोली ते सेनगाव मार्गावर पुसेगाव शिवारात हिंगोली ग्रामीण उपविभागाच्या पथकाने मंगळवारी ता. 8 सकाळी अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले आहे. यामध्ये 18.12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका व्यक्ती विरुध्द नर्सी नामदेव पोसिल ठाण्यात ग
.
हिंगोली जिल्ह्यात अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाचे विशेष पथक तर पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस विभागाचे विशेष पथक कार्यरत आहेत. या दोन्ही पथकांकडून वाळू घाटावर जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची तपासणी केली जात आहे. विशेष म्हणजे सार्वजनीक सुट्टीच्या दिवशी रात्रीच्या वेळी वाहन तपासणी करून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारी वाहने पकडली जात आहेत.
दरम्यान, सेनगाव तालुक्यातील जांभरूनतांडा ते पुसेगाव मार्गावर एका टिप्पर मधून वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिस विभागाला मिळाली होती. त्यावरून हिंगोली ग्रामीण उपविभागाच्या विशेष पथकाचे उपनिरीक्षक विकास राठोड, जमादार अंकुश कल्याणकर, कैलास गायकवाड यांच्या पथकाने सकाळी सात वाजल्या पासून पुसेगाव शिवारात वाहनांची तपासणी सुरु केली होती. यामध्ये पोलिसांनी एक टिप्पर (एमएच-21-बीएच-3961) थांबवून चालकाकडे चौकशी केली. मात्र त्याने वाळू वाहतूकीचा परवाना दाखविण्याबाबत उडवा उडवीची उत्तरे दिली.
यावरून पोलिसांनी अडीच ब्रास वाळू भरलेले टिप्पर ताब्यात घेऊन नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात जमा केले. या प्रकरणी उपनिरीक्षक विकास राठोड यांच्या तक्रारीवरून सोपान लोंढे (रा. लाख, ता. औंढा) याच्या विरुध्द नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक घारगे, जमादार व्हि. बी. कुटे पुढील तपास करीत आहेत.