Pune Crime News: पुण्यातील कोंढवा बलात्कार प्रकरणात आत्तापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. तरुणीने सुरुवातीला तिच्यावर डिलिव्हरी बॉय बनून आलेल्या तरुणाने बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली होती. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. मात्र पोलिस तपासात तरुणीनेच तरुणाविरोधात खोटी तक्रार दाखल केल्याचे समोर आले होते. आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक वळण समोर येण्याची शक्यता आहे. पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाबाबत गांभीर्याने दखल घेतली आहे. खोट्या तक्रारीनंतर पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत फेक नरेटिव्ह पसरवले जात असल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.
रविवारी अमितेश कुमार यांनी सिंहगड रोड पोलिस स्टेशन अंतर्गंत एका नवीन पोलीस चौकीचे उद्घाटन केले. त्यावेळेस त्यांनी कोंढवा बलात्कार प्रकरणाचा उल्लेख करत नाराजी व्यक्त केली आहे. तरुणीने घरात घुसून बलात्कार झाल्याची खोटी तक्रार दिल्यामुळं पुणे शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडली आहे, असा चुकीचा संदेश पसरवला जात आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच, तक्रार दाखल करण्यापूर्वी तरुणीने आपल्या प्राध्यापिकेकडून मार्गदर्शन घेतल्याचा संशय आहे.
22 वर्षाच्या तरुणीने तक्रार दिली होती की एका अनोळखी डिलिव्हरी एजंटने पुण्यातील घरात जबरदस्ती प्रवेश करत काहीतरी केमिकल स्प्रे केला. त्यानंतर ती बेशुद्ध झाली. त्यानंतर त्याने बलात्कार केला. इतकंच नव्हे तर तिच्या मोबाइलमध्ये सेल्फी काढून मी परत येईन, अशी धमकीदेखील दिली. मात्र अवघ्या 24 तासांतच ही तक्रार खोटी असल्याचे पुणे पोलिसांनी उघड केले. महिलेनेच हा बनाव रचला असून तरुण हा पीडितेच्या ओळखीचाच असल्याचे समोर आले आहे.
पुणे पोलिस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेनेच तिच्या मित्राला घरी बोलवले होते. तसंच तो सेल्फीदेखील तिच्या संमतीने काढण्यात आला होता. जो नंतर तिनेच एडिट केला होता. तिथे आल्यानंतर दोघांमध्ये काही वाद झाले त्यानंतर महिलेने खोटी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिची व तिच्या मित्राची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. तसंच तिला समुपदेशनासाठी पाठवण्यात आलं आहे.
दरम्यान, या प्रकरणात महिलेला तिच्याच प्राध्यापक असलेल्या मैत्रिणीने मदत केल्याचा संशय आहे. पोलिसांनी एका खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील महिला प्राध्यापकांचा जबाब नोंदवला आहे. या प्राध्यापक महिलेच्या तक्रारीपूर्वी तिच्या संपर्कात होत्या. तक्रार दाखल करण्यापूर्वी तिने प्राध्यापिकेकडून मार्गदर्शन घेतले होते. तक्रार कशी दाखल करावी आणि तपास अधिकाऱ्यांशी कसे बोलावे, याबद्दल तिने प्राध्यापिकेकडून माहिती घेतली होती, अशी माहिती समोर येतेय.