Gunaratna Sadavarte on Nishikant Dubey : महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषेचा वाद सुरु असताना भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्याने वातावरण तापलंय. “तुम्ही कोणाच्या भाकरी खात आहात? , महाराष्ट्र कोणाच्या पैशांवर जगतोय असा थेट हल्ला त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर केला आहे. या वादात आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी मारली आहे. महाराष्ट्र आणि मराठी लोकांविरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या दुबेंना सदावर्ते यांनी पाठिंबा दिला आहे.
‘मराठीबद्दल विरोध…’
झी २४ तासशी बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, मी पहिला व्यक्ती आहे, ज्याने निशिकांत दुबे यांच्याशी थेट फोन करुन त्यांची भूमिका समजून घेतली आहे. त्यांनी थेट मराठीबद्दल विरोध केला नाही. त्यांनी संविधान नियमानुसार त्यांचं मत व्यक्त केलं आहे. आपण भारतात राहतो त्यामुळे आपण हिंदुस्तानी आहोत. नागरिकत्व हे भारताचं असतं त्यामुळे मी त्यांच्याशी एक भारतीय म्हणून संवाद साधला. त्यांच्या वक्तव्यामध्ये कुठेही तेढ निर्माण करावा असं काही नव्हतं. काही गोष्टी ज्या आहेत त्या ढोबळ मनाने सहज बोलणारी म्हणजे हे असं करु नका रे, तुम्ही टिपून मारू नका रे, तुम्ही हिंदुंनाच मारत आहात, असं ते त्यांच्या वक्तव्यातून म्हणत आहे.
सदावर्ते पुढे म्हणाले की, ‘ठाण्यात मारहाण केली तुम्ही ते कोणत्या समाजाचे होते? ते हिंदू होते. मीरा भाईंदरमध्ये मारहाण केली, सगळ्यांनी बघितलं. मारहाणीचं कोणीही समर्थन करणार नाही. ते कोणत्या समाजाचे होत. यानंतर प्रतीप्रश्न तर कोणीपण करेल ना. तो प्रतीप्रश्न असा होता, माहिममध्ये उद्धव यांच्या पक्षाचा आमदार आहे, तिथे जाऊन ते कोणती भाषा वारतात?, खरं तर मुद्दा देशाची भाषा हिंदी आहे आणि आपण हिंदु आहोत.’
निशिकांत दुबे नेमकं काय म्हणाले?
‘महाराष्ट्र कोणाच्या पैशांची भाकरी खातो. तिकडे टाटा, बिर्ला आणि रिलायन्स असेल. पण त्यांचा कोणताही कारखाना महाराष्ट्रात नाही. बिहार, झारखंड नसतं तर टाटा आणि बिर्ला यांनी काय केलं असतं? टाटा , बिर्ला आणि रिलायन्स मुंबईत टॅक्स भरतात पण टाटांनी पहिला कारखाना बिहारमध्ये उघडला. महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो. तुम्ही कोणता टॅक्स आणता. तुमच्याकडे कारखाना नाही, उद्योग नाहीत किंवा खनिजाच्या खाणी नाहीत. सगळ्या खाणी झारखड, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि ओडिसात आहेत. रिलायन्सची रिफायनरी आणि सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये आहे. महाराष्ट्रात काय आहे? मग वरुन आमचं शोषण करुन दादागिरी करता’ असं वादग्रस्त विधान दुबे यांनी केलं आहे.