कवितारूपी मैत्रीण अलगदपणे जीवनात येते आणि रजनीगंधासारखी दीर्घकाळ आयुष्य दरवळून टाकते. यातूनच प्रौढत्वी निज शैशवास जपणे शक्य होते, असे मत ज्येष्ठ कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे यांनी व्यक्त केले.
.
करम प्रतिष्ठानतर्फे नवी पेठेतील पत्रकार भवन येथे ‘करम रजनीगंधा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कविसंमेलन आणि चर्चासत्र असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉ. बाबुल पठाण होते. कार्यक्रमाचे संयोजक, करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर, प्रज्ञा महाजन, स्वाती सामक मंचावर होते.
प्रज्ञा महाजन यांनी प्रास्ताविक केले. डॉ. बाबुल पठाण यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि करम प्रतिष्ठानची वाटचाल सांगितली. स्वाती सामक, अनुराधा काळे, सुजाता पवार आणि डॉ. दाक्षायणी पंडित यांनी उपस्थितांशी संवाद साधला व मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात आयोजित कविसंमेलनात जयंत कुलकर्णी, धनंजय तडवळकर, वासंती वैद्य, डॉ. रेखा देशमुख, माधुरी डोंगळीकर, शैलजा किंकर, स्मिता जोशी-जोहरे, रेखा येळंबकर, माधुरी दीक्षित, प्रतिभा पवार, प्रज्ञा कुलकर्णी यांनी कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. वयाने ज्येष्ठ परंतु मनाने चिरतरूण असणाऱ्या कवींच्या सादरीकरणाने रसिक श्रोत्यांची मने जिंकली.
डॉ. आशुतोष जावडेकर यांना रंगत-संगत प्रतिष्ठनचा काव्य प्रतिभा पुरस्कार
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या काव्य प्रतिभा पुरस्काराने प्रसिद्ध व्याख्याते, लेखक, कवी डॉ. आशुतोष जावडेकर यांना गौरविले जाणार आहे.
पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दि. 13 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे वितरण विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत लेखक, कवी डॉ. राजा दीक्षित यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यंनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून यात बंडा जोशी, प्रमोद खराडे, माधव हुंडेकर, मृणालिनी कानिटकर-जोशी, तनुजा चव्हाण, वर्षा बेंडिगेरी-कुलकर्णी, स्वप्नील पोरे, सुजित कदम, विजय सातपुते, डॉ. मृदुला कुलकर्णी-खैरनार यांचा सहभाग असणार आहे.