छत्रपती संभाजीनगर ‘संडे क्लब’ आणि देशपांडे परिवाराच्या वतीने देण्यात येणारा श्याम देशपांडे ग्रंथसखा पुरस्कार अभिजित जोंधळे यांना जाहीर झाला आहे. अकरा हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जोंधळे यांचा या पुरस्काराने 3 ऑगस्ट रोजी ग
.
वाचन संस्कृती रुजविण्यासाठी आयुष्यभर निरपेक्षपणे कार्यरत राहिलेल्या श्याम देशपांडे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. अभिजित जोंधळे हे सुद्धा ग्रंथप्रेमी आहेत. ते अंबाजोगाईत अनुराग पुस्तकालय चालवतात.
पुस्तकपेटीचा अभिनव उपक्रम
अभिजित जोंधळे यांनी गेल्या दहा वर्षांपासून पुस्तकपेटी हा अभिनव उपक्रम राबवला. त्यामुळे ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना वाचनीय पुस्तके उपलब्ध होत आहेत. गेल्या दहा वर्षात किमान 15 हजार विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ झाला आहे. यापूर्वी हा पुरस्कार मिर्झा अब्दुल कय्युम नदवी, जीवन इंगळे आणि मोहिनी कारंडे यांना दिला गेला आहे.
पुरस्काराचे चौथे वर्ष
श्याम देशपांडे ग्रंथसखा पुरस्काराचे यंदा चवथे वर्ष आहे. श्याम देशपांडे हे पुस्तकप्रेमी तसेच पुस्तकप्रेमींचे मित्र होते. मराठवाडा साहित्य परिषद, सरस्वती भुवन शिक्षण संस्था इत्यादी संस्थांशी त्यांचा संबंध होता. औरंगाबाद शहरातील विविध साहित्यिक तसेच सांस्कृतिक उपक्रमात त्यांचा निरपेक्ष आणि स्नेहशील सहभाग रहात आला आहे.
राजहंसचे केले काम
श्याम देशपांडे यांचे मूळ गाव पोहंडूळ (ता. पुसद जि. यवतमाळ). शालेय शिक्षणानंतर पदवीसाठी ते संभाजीनगरला आले. स. भु. महाविद्यालयांतून त्यांनी कला शाखेची पदवी प्राप्त केली. आएमटीआर संस्थेत काही वर्षे त्यांनी नोकरी केली. त्यानंतर विद्या बुक्समध्ये ते कार्यरत होते. त्यानंतर गेली 25 वर्षे राजहंस प्रकाशनाच्या मराठवाडा विभागाचे प्रतिनिधी म्हणून औरंगाबाद येथे ते कार्यरत होते.
देशपांडे यांचे योगदान
मराठवाड्यातील साहित्य चळवळ, ग्रंथालय चळवळ, सांस्कृतिक चळवळ यांत श्याम देशपांडे यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. मराठी प्रकाशक परिषद अध्यक्षीय भाषणे” या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले होते. आता त्यांच्या कार्याचे स्मरण म्हणून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.