पुणे शहरातील लोहगाव परिसरात एका भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. तर या अपघातात दोन लहान मुले देखील जखमी झाली आहे.
.
रुक्मिणी राजू चव्हाण (वय २९, रा. वडगाव शिंदे रस्ता, लोहगाव ) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात चव्हाण यांची दोन लहान मुले जखमी झाले. याबाबत राजू चव्हाण (वय ३३) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार राजू, त्याची पत्नी रुक्मिणी आणि दोन मुले लोहगाव भागातून जात होते. धानाेरी जकात नाक्याजवळ पाठीमागून आलेल्या भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी रुक्मिणी आणि त्यांची दोन मुले जखमी झाली.अपघातात रुक्मिणी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी मुलांसह रुक्मिणी यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारांदरम्यान रुक्मिणी यांचा मृत्यू झाला.तर मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पोचालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस कर्मचारी वाय. एस. चव्हाण पुढील तपास करत आहे.
कारच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू
मुंबई-पुणे रस्त्यावरील पाटील इस्टेट भागात भरधाव मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर पसार झालेल्या कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठाचे वय अंदाजे ६५ वर्ष असून, त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. मुंबई-पुणे रस्त्यावरील पाटील इस्टेट पूल परिसरातून ज्येष्ठ नागरिक पायी जात होता. त्यावेळी भरधाव कारने ज्येष्ठा नागरिकला धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या कारचालकाविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक एस गाडेकर पुढील तपास करत आहेत.