संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथे आषाढी एकादशी निमित्त रविवारी ता. 6 सुमारे 1.50 लाख भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज असून त्यादृष्टीने संस्थानकडून जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती संस्थानचे उपाध्यक्ष भिकाजी किर्तनकार यांनी द
.
संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथे आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण मराठवाड्यातून भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांची सोय व्हावी तसेच पावसाचा अंदाज लक्षात घेऊन संस्थानच्या वतीने 60 बाय 140 व 30 बाय 130 चौरस फुट आकाराचे दोन वॉटरप्रुफ मंडप उभारण्यात आले आहेत.
दरम्यान, रविवारी ता. 6 सकाळी सात वाजता जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते महापूजा होणार आहे. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, संस्थानचे विश्वस्त मनोज आखरे, द्वारकादास सारडा, भिकुलाल बाहेती, माजी सभापती संजय उर्फ भैय्यासाहेब देशमुख, ब्रिजलाल तोष्णीवाल, राहुल नाईक यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. सकाळी महापूजा झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले केले जाणार आहे.
आषाढी एकादशीमुळे सकाळपासूनच भाविकांची गर्दी होणार असून दिवसभरात सुमारे 1.50 लाख भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज आहे. या भाविकांसाठी गिलोरी येथील माणिकराव लोडे यांच्या वतीने सुमारे 40 ते 50 क्विटल साबुदाणा खिचडीचे वाटप केले जाणार आहे. या शिवाय नर्सी नामदेव पोलिस ठाणे व पोलिस मुख्यालयातील सुमारे 100 पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दिव्यांग भाविकांना थेट दर्शनाची सोय
यावेळी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन दिव्यांग भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी दर्शनासाठी आलेल्या दिव्यांग भाविकांना थेट दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी स्वंयसेवक मदत करणार त्यांना मदत करणार असल्याचे संस्थानचे उपाध्यक्ष भिकाजी किर्तनकार यांनी सांगितले.