शहरातील विद्यादीप बालगृहातील मुलींच्या छळाचे विविध प्रकार समोर येत आहेत. यातच बालगृहातील मुलींचे कुठल्याही कारणाने पोट दुखले तरी प्रेग्नन्सी टेस्ट केली जात होती. तर याची वाच्यता बाहेर केली तर ‘बाहेरचे लोक केवळ १५ मिनिटांसाठी येतात, आम्ही कायम आहोत’ अ
.
विद्यादीप बालगृहात मुलींचा अतोनात छळ होत असल्याचा आरोप करत ९ मुलींनी सोमवारी (३० जून) बालगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून उड्या घेत पळ काढला. त्यानंतर ‘विद्यादीप’मधील अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. ठाकूर यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या माहितीनुसार, बालगृहातील मुलींचे पोट कुठल्याही कारणाने दुखले तरी त्यांच्या प्रेग्नन्सी टेस्ट केल्या जायच्या. त्यास विरोध झाल्यास प्रसंगी मुलींना मारहाणदेखील करण्यात येत होती. दरम्यान, फरार मुलगी न्यायालयाच्या परिसरातून पळून गेली. तिच्या शोधासाठी दामिनी पथक, छावणी आणि पुंडलिकनगर पोलिस तिचा शोध घेत आहेत. बालगृहातील मुली आजारी पडल्यावर त्यावर उपचार म्हणून एकाच प्रकारची गोळी दिली जात होती. त्यामुळे मुली अनेक दिवस एकाच आजाराने ग्रासलेल्या राहायच्या. त्यानेदेखील मुली बऱ्या झाल्या नाही तर पवित्र पाणी शिंपडून अथवा शरीरावर वेगळी चिन्हे काढून त्यांना आता तुम्ही बऱ्या व्हाल असा दावा करण्यात येत असल्याचा आरोपही ठाकूर यांनी केला. या आरोपानंतर बालसुधारगृह प्रशासनाशी संपर्क केला असता, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.
मुलींची तक्रार सुविधांविषयी होती, जातीयवादाची नव्हती
मुलींनी बालकल्याण समितीपुढे टूथब्रश, साबण मिळत नाही तसेच खोल्यांमध्ये कॅमेरे लावले आहेत, ते आम्हाला नको आहेत, अशा तक्रारी मांडल्या होत्या. जातीयवादाची तक्रार करण्यात आली नव्हती. दरम्यान, मंगळवारी समितीने दिलेल्या भेटीत कुणीही तक्रार दिली नसल्याचे सांगण्यात आले आहे. या वेळी महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.
शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना अडवले
शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या प्रतिभा जगताप, इतर सदस्यांनी विद्यादीप गाठले. परंतु कर्मचाऱ्यांनी त्यांना आत प्रवेश दिला नाही. त्यामुळे पदाधिकारी आक्रमक झाल्या होत्या.
सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना निवेदन देण्यात आले. घटनेचे गंभीर्य लक्षात घेऊन बालकल्याण समिती बरखास्त करावी, अशी मागणी उपस्थित महिलांनी केली. निवेदनात म्हटले आहे की, किरकोळ कारणावरून मारहाण केली जाते, राहण्याच्या खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत, धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जातो, जादूटोणा केलेले पाणी प्यायला दिले जाते आदी अनेक गंभीर आरोप निवेदनात केले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांनी पीडित मुलींची बाजू नीट ऐकून न घेता प्रकरणात तथ्य नसल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत पीडित मुलींनी कुठे जावे, असा प्रश्न सकल हिंदू समाजाने केला आहे.