Kalyan Crime News: कल्याण पोलिसांनी केलेल्या एका महत्त्वाच्या कारवाईमध्ये गोमांसाची तस्करी करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी 1300 किलो गोमांस जप्त केलं आहे. विशेष म्हणजे गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली असून या माध्यमातून एक मोठं रॅकेट समोर येण्याची शक्यताही नाकारता येत नाही असं सांगितलं जात आहे.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण तालुका पोलिसांना एक गुप्त बातमीदार व बजरंग दालाच्या कार्यकत्यांकडून माहितीच्या आधारे गोमांस तस्करीसंदर्भात कारवाई केली. एका वॅगनआर गाडीने गोमांस घेऊन जाणार असल्याची टीप पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कल्याण तालुक्यातील रायता नदीच्या पुलाजवळ आणे-भिसोळ रोडवर सापळा रचून येथून जाणारी सर्व वाहने थांबून तपासणी सुरु करण्यात आली. यावेळी तपासणीदरम्यान पोलिसांना वॅगनआर कार क्रमांम एम. एच 05 ई.व्ही 7861 या गाडीला थांबवलं. 56 वर्षीय जलाउद्दीन करीम शेख हा मूळचा अंबरनाथमधील उळनचाळ कार चालवत होता. या वॅगनरची तपासणी केली असता त्यामध्ये गोमांस आढळून आलं.
नाकाबंदीदरम्यान वॅगनआर थांबवली अन्…
जलाउद्दीन आपल्या वॅगनआर गाडीमधून वाहुली येथून गोवंश जातीच्या जनावरांचे मांस घेऊन जात असल्याचं तपासणीदरम्यान स्पष्ट झालं. अनधिकृतपणे निर्दयीपणे प्राण्यांची कत्तल करुन महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदयाचे कलमाचे उल्लंघन करत सक्षम प्राधीकरणाचे कोणत्याही प्रकारचं प्रमाणपत्र धारण न करता निर्दयी पध्दतीचा वापर करुन जनावरांची हत्या करुन ते गोमांस उल्हासनगर येथे विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचं तपासात समोर आलं.
पोलीस कारवाई सुरु असतानाच अचानक तिथे थार आली अन्…
याबाबत पोलिसांनी कारवाई करतानाच एक थार कार घटनास्थळी आली व कारमधील जैनुद्दीन जलाउद्दीन शेख (वय 30 वर्षे, राहता उलण चाळ, एस.पी.पी. रोड अंबरनाथ) आणि सकलैन जलाउद्दीन शेख (वय-27 वर्षे) यांनी पोलिसांशी वाद करुन पोलिसांच्या कारवाईत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
यापूर्वीही केलेली मांसाची वाहतूक?
या प्रकरणी कल्याण तालुका पोलिस ठाण्यात चालक जलाउद्दीन करीम शेख, जैनुद्दीन जलाउद्दीन शेख व सकलैन जलाउद्दीन शेख यांच्या विरुध्द महाराष्ट्र पशुसंवर्धन सुधारण अधिनियम 1995 चे कलम -5,5 (क),5.5 (ब), 9, 9 (अ) (ब) 11 प्राण्यांना कुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11 (1), एल. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांकडून पोलिसांनी 1300 किलो गोमांस जप्त करण्यात आलं. पोलिसांनी आरोपी व वहानं ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणामध्ये इतरही लोक सहभागी आहेत का याचा पोलीस शोध घेत असून यापूर्वी आरोपींनी किती वेळा अशाप्रकारे मांस वाहतूक केली आहे याचाही शोध घेतला जात आहे.