देशातील पहिले व जगातील पाचवे दिव्यांग आयर्न मॅन निकेत श्रीनिवास दलाल (४३, रा. खडकेश्वर) यांचा समर्थनगर परिसरातील एका हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. हा प्रकार मंगळवारी (१ जुलै) सकाळी आठच्या सुमारास घडला. ते माजी उपमहापौर लता दलाल यांचे
.
दलाल यांच्या घराला ३० जूनला रात्री आग लागल्याने तेथे थांबणे योग्य नसल्याने रात्री अडीचच्या सुमारास मित्रांनी त्यांना हॉटेलमध्ये सोडले. सकाळी आठच्या सुमारास ते हॉटेलच्या पार्किंगमध्ये पडलेले दिसून आले. त्या वेळी हॉटेलचालकाने रुग्णवहिकेशी संपर्क साधला. कुटुंबीय देखील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी निकेत यांना घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. निकेत यांच्या अंगावर अनेक जखमा होत्या, अशी माहिती पोलिस निरीक्षक सुनील माने यांनी दिली.
दृष्टी गेली तरी जिद्द कायम ठेवत केली उत्तुंग कामगिरी
दुसरीमध्ये असताना निकेत यांना सायकलचा स्पोक लागला. त्यामुळे त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेली. त्यानंतर काही काळाने त्यांच्या दुसऱ्या डोळ्यास ल्युकेमिया या दुर्धर आजाराने ग्रासले. त्यामुळे त्यांची दृष्टी गेली. त्यांनी स्पीच थेरपिस्ट म्हणून आपले काम सुरू ठेवले. त्यांनी २०२०मध्ये दुबई येथे दीड किमी जलतरण, ९० किमी सायकलिंग, २१.१ किमी पळणे अशी उत्तुंग कामगिरी करून देशातील पहिला व जगातील पाचवा आयर्नमॅन होण्याचा मान पटकावला.