Navi Mumbai Crime News: नवी मुंबईतील पनवेल येथे स्वप्नालय आश्रमाच्या बाहेर अवघ्या दोन दिवसांचे तान्हे बाळ सापडले होते. हे नवजात बाळ एका बास्केटमध्ये ठेवून त्यात दूध पावडर, दुधाची बाटली आणि त्याच एक चिठ्ठीदेखील ठेवली होती. इंग्रजी भाषेत लिहिलेल्या या चिठ्ठीत बाळाला अशाप्रकारे सोडून जात असल्यामुळं सॉरी लिहिलेले होते. या घटनेची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी लगेचच तपासाचे चक्र फिरवत तपास केला असता बाळाच्या आई-वडिलांचा शोध घेण्यात यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाच्या आई-वडिलांचे लग्न झालेले नव्हते. प्रेम प्रकरणातून हे बाळ झाल्याचे उघड झाले आहे. मुलाच्या घरच्यांना मुलगी पसंत नव्हती त्यामुळं ती आई-वडिलांकडे भिवंडी येथे राहत होती. त्याकाळात ती गर्भवती राहिली होती. त्यातच तिला आठव्या महिन्यात बाळ झाले. पण बाळाला सांभाळणे शक्य नसल्याने त्यांनी बाळाला अनाथाआश्रमात सोडण्याचा निर्णय घेतला. बाळाच्या वडिलांचे नाव अमन इक्बाल कोंडकर असं असून तो भिवंडीचा रहिवाशी आहे.
पोलिसांनी आई-वडिलांना ताब्यात घेतलं आहे. चौकशीत आई-वडिल बाळाला सांभाळण्यासाठी तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. सध्या बाळ वात्सल्य ट्रस्टमध्ये असून सरकारी नियमानुसार आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन बाळ परत आई वडिलांना देण्यात येणार आहे. मात्र या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
काय घडलं नेमकं?
नवी मुंबईतील तक्का विभागात असलेल्या स्वप्नालय या मुलींच्या बालगृहाजवळ, फुटपाथवर दोन दिवसांचं नवजात बाळ सापडलं. हे बालगृह महिला आणि बालविकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे मान्यताप्राप्त असून, या संस्थेच्या इमारतीच्या खालच्या भागातच एका बास्केटमध्ये बाळ आढळून आलं. प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बास्केटमध्ये बाळाबरोबर सेरेलॅक, कपडे आणि एक इंग्रजीत लिहिलेली चिठ्ठीही सापडली. या चिठ्ठीत मी माझ्या बाळाचा सांभाळ करू शकत नाही. माझी आर्थिक परिस्थिती वाईट आहे, मानसिकदृष्ट्या मी सक्षम नाही. माझ्या बाळाची हेळसांड होऊ नये, त्याची काळजी घ्या. भविष्यात मला बाळाला भेटता आलं, तर नक्की भेटेन. कृपया मला माफ करा.’ असे लिहिले आहे.