Bhaskar Jadhav : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी झी २४ तासच्या टू द पॉईंट या कार्यक्रमात निवृत्तीचे संकेत दिले आहे. झी २४ तासचे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या मुलाखतीत भास्कर जाधव यांनी अनेक गौप्यस्फोट केलेत. ते म्हणाले की, मला दिलेलं काम प्रामाणिकपणे करायचं हे मी नेहमी करतो, राजकारणात सर्वस्व झोकून देऊन काम केलं, तशाच पद्धतीने समाजकारणात केलं. राजकारण, समाजकारण, उत्सव, शेतीत मी रमतो, पण आता खरं सांगू का, आता असं वरच्यावर मनात येऊ लागलं की आता राजकारणातून निवृत्ती घ्याला हवी. आता सत्तरी जवळ आली या वेळी विरोधीपक्ष नेते पद मिळेल असं वाटलं होतं. पण सत्ताधारी पक्ष मला घाबरत असल्याने हे शक्य होऊ शकले नाही, अशी खंतही भास्कर जाधव यांनी बोलून दाखवली.
आतापर्यंत बेधडक आणि बिनधास्त राजकारण केले. त्यामुळे राजकारणात मन रमत होतं. आता वयाची सत्तरी जवळ आली आहे. विरोधीपक्ष नेते पद पदरात पडेल असे वाटत होतं. विरोधीपक्ष नेता कसा असावा, हे महाराष्ट्राला दाखवून द्यायचं होतं. स्वतःचा स्वार्थ काही नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेत तरतूद आहे. विरोधीपक्ष नेता असा असला पाहिजे समोर सत्ताधारी कितीही बलाढ्य असला तरी त्याच्या डोळ्यात डोळे घालून जाब विचारण्याची ताकद असेल तो विरोधीपक्ष नेता असला पाहिजे. तर सरकार चांगलं चालतं आणि राज्य चांगलं चालतं , वैधानिक काम कसे करायचं हे सत्ताधाऱ्यांना दाखवून द्यायचं आहे. पण, सत्ताधारी पक्ष मला घाबरत आहे. ते मला घाबरत असल्याचा मला आनंद होत आहे. नैराश्य येत नाही असेही भास्कर जाधव यांनी सांगितले.
सत्ताधारी पक्ष माळवणकरांचा संदर्भ देऊन दहा टक्के आमदारांचा नियम पुढे करतात. पण मी कायदा कोळून प्यायलो आहे. ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा विरोधीपक्ष नेता हे घटनेत लिहिलेले आहे. सत्ताधारी पक्षाला घटना मान्य नाही, असा आरोपही जाधव यांनी यावेळी केला.
मविआत मंत्रीपद न मिळाल्याची खंत
2019 मध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. यापूर्वी मी कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले होते. पण त्यावेळी काय झाले माझ्या नावाचा मंत्री म्हणून विचार केला नाही. त्यामुळे मला वाईट वाटलं. पण शिवसेना पक्षात पक्ष नेतृत्त्वाचा निर्णय हा अंतीम असतो. तो मी स्वीकारला आणि पुढे गेलो. त्यामुळे मी निराश झालो नाही.
दरम्यान संपूर्ण मुलाखत पाहा आज रात्री 9.00 आणि रविवारी 22 जूनला दुपारी 12.00 वाजता फक्त झी 24 तासवर..