Chandrakant Patil : राज्याचे रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्यावर अघोरी पूजा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेपाठोपाठ मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसनेही भरत गोगावले यांचा पूजा करतानाचा व्हिडिओ ट्विट करत अघोरी पूजा केल्याचा आरोप केला आहे. मात्र मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गोगावले यांची पाठराखण केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी मात्र भरत गोगावले यांची ही पूजा जनतेच्या कल्याणासाठी केली असल्याचे वाटत आहे असं म्हटलं आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना भरत गोगावले यांच्यावर करण्यात आलेल्या अघोरी पूजेच्या आरोपांसंदर्भात विचारलं असता चंद्रकांत पाटील यांनी हे असं उत्तर दिलं आहे. विरोधक आणि मित्रपक्षांना ज्या अघोरी पूजेचे आरोप केलेत. जे व्हिड़िओ भरत गोगावले यांचे समोर आणलेत. त्या सगळ्या पूजा चंद्रकांत पाटील यांना जनतेच्या कल्याणासाठी आणि सुखसमाधानासाठी केल्याचं वाटत आहे. एखाद्या नेत्याची पाठराखण करत असताना आपण काय विधान करतोय हे ही कदाचित चंद्रकांत पाटील विसरलेले दिसत आहेत.
झी 24 तासला दिलेल्या टू द पॉईंट या स्फोटक मुलाखतीत भरत गोगावले यांनी रश्मी ठाकरे यांच्यावर आरोप केला होता. या आरोपांनतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी भरत गोगावले यांच्यावर अघोरी पूजा केल्याचा आरोप करत एक व्हिडिओ सोशल मीडियाव शेअर केला आहे.
पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावलेंची अघोरी पूजा, सूरज चव्हाण यांचा आरोप
त्यानंतर तर वसंत मोरे यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी देखील भरत गोगावले यांच्या पुजेचा एक व्हिड़िओ समोर आणत अघोरी पूजेचा आरोप केला होता. पालकमत्रीपदासाठीच भरत गोगावले यांनी पूजा केल्याचा आरोपही सुरज चव्हाण यांनी केला होता.
भरत गोगावलेंनी आरोप फेटाळले
विरोधकांवर मात करण्यासाठी भरत गोगावले यांनी पूजा केल्याचा आरोप वसंत मोरे यांना केला आहे. तर मंत्री भरत गोगावले यांनी मात्र पुन्हा एकदा अघोरी पूजा केल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. पुरोगामी महाराष्ट्रातील मंत्री भरत गोगावले अशा पद्धतीने वेगवेगळ्या पूजा करत आहेत. स्वतः त्याचं समर्थनही करत आहेत. मात्र चंद्रकांत पाटलांसारखे ज्येष्ठ मंत्री ही पाठराखण करण्याच्या नादात ही पूजा जनतेच्या कल्याणासाठी आहे असं म्हणत आहेत. अशा आंधळ्या पाठराखण करण्यामुळे अंद्धश्रद्धेला आपण खतपाणी घालतोय हेच चंद्रकांत पाटील विसरून गेल्याचं दिसत आहे.