मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या वरचेवर येत असतात. मात्र एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाची रखडलेली गाडी काही पुढे जायचं नाव घेत नाहीये. देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर असताना खडसे कार्यक्रम स्थळी पोहोचले मात्र खडसेंची फडणवीसांसोबत भेट होऊ शकली नाही. फडणवीसांनी ही भेट टाळली का? अशाही चर्चा सुरू झालेत.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या वरचेवर येत असतात. मात्र एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाची रखडलेली गाडी काही पुढे जायचं नाव घेत नाहीये. मुख्यमंत्री फडणवीसांच्या जळगाव दौऱ्यात एकनाथ खडसेंची मुख्यमंत्र्यांनी भेट टाळल्याचं बोललं जातंय. धरणगावमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची सभा पार पडली.
या सभेला राष्ट्रवादी पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे उपस्थित होते. फडणवीस व्यासपीठावर तर खडसे व्हीआयपी कक्षात बसल्याचं पाहायला मिळालं. मात्र फडणवीस आणि खडसे यांची प्रत्यक्ष भेट आणि संवाद झाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांची भेट सोडा त्यांचं नावही घेणं टाळल्याचं पाहायला मिळालं. मात्र या सगळ्या चर्चा एकनाथ खडसे यांनी फेटाळून लावलेत. तर आपल्या भाजप प्रवेशाचा विषय संपल्याचंही खडसेंनी सांगून टाकलंय.
तर खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवरून जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना आत्मपरिक्षणाचा सल्ला दिलाय. तर राजकारणात पूर्णविराम नसतो, तर स्वल्पविराम असतो असं सूचक विधान उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशाचा विषय संपल्याचं आतापर्यंत अनेकदा खडसेंनी स्वतः सांगितलंय. मात्र खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा आणि बातम्या काही केल्या थांबत नाहीयत.