Mumbai Train Tragedy: मध्य रेल्वेवर मोठा अपघात झाला आहे. दोन लोकलमधून तब्बल 13 प्रवासी खाली पडले आहेत. तर या अपघातात 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तसंच, अपघात रोखण्यासाठी लोकलला आता स्वयंचलित दरवाजे बसवण्यात येतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेनंतर राजकीय नेत्यांसह अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्वयंचलित दरावाजांच्या प्रणालीबाबत शंका व्यक्त केली आहे. तसंच, रेल्वे प्रशासनावरही तोफ डागली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ‘आम्ही हजार वेळा मागणी केलीये की दिवा टर्मिनेटिंग लोकल सुरू करावी. एवढी लोकसंख्या वाढल्यानंतर रेल्वेच्या सेवा वाढल्या का? तर त्याचे उत्तर नाही आहे. याउलट एसी लोकल सुरू केल्यामुळं ज्या साध्या लोकल आहेत त्याच्या फेऱ्या कमीच झाल्या आहेत. पण यात खोलात न शिरता. माझी आजही मागणी आहे ती, पहिले दिवा टर्मिनेटर लोकल सुरू करा. त्यामुळं गर्दीचा जो ताण आहे तो कमी होईल. कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांचीही सोय होईल. दिवा, कळवा आणि मुंब्रा या नागरिकांची सोय होईल. कारण ठाणे, डोंबिवली टर्मिनेटर आहे. कल्याण तर जंक्शन आहे. पण रेल्वेने कोणतीच सोय केली नाही,’ असं आव्हाडांनी म्हटलं आहे.
‘दिवा टर्मिनेटर झाली तर दिवा, कळवा आणि मुंब्राच्या लोकांची सोय होईल. मुंब्रा पार केल्यानंतर कळव्याला जाताना जो बोगदा लागतो त्यातील तीन पोल अतिषय जवळ आहेत. या पोलला धडकून अनेकांचा जीव गेला आहे. अनेक वर्षांची मागणी आहे तो पोल काढावा किंवा बाजूला करा पण रेल्वेच्या कानावर या गोष्टी जातच नाही,’ अशी टिकाही त्यांनी केली आहे.
‘मुंबई लोकलला कितपत सुविधा दिल्या जातात हे तपासण्यासारखं आहे. सर्वाधिक महसूल हा मुंबई लोकलमधून मिळतो. एसी लोकल वाढल्यामुळं साध्या लोकल कमी झाल्या आहेत. एसी लोकलचा खिशाला परवडणारा प्रवास नाहीये. ज्याच्या खिशाला परवडत नाही त्याचे काय आणि ज्याला परवडत नाही अशांची संख्या मुंबईत अधिक आहे. ट्रेनमध्ये लटकणाऱ्या लोकांची संख्या जेव्हा कमी होईल तेव्हा हे खरे रेल्वेचे यश आहे,’ असंही त्यांनी नमूद केलं आहे.
‘स्वयंचलित दरवाजे हे साध्या लोकलसाठी इम्पोसिबल आहे. प्रवास करताना गुदमरतील लोक. श्वास घ्यायला हवा तर आली पाहिजे. उगाच काहीतरी एक अपघात झाल्यानंतर विनोदी भाष्य करतात. दरवाजे कसे बंद होणार. दरवाजे बंद झाल्यावर श्वास कसा घेणार आतमधला माणूस,’ अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.